अकोला : तक्रारदाराकडून त्याच्या तीन वाहनांचे ‘कॅलीब्रेशन’ करून व्यवसाय करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात सात हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी येथील वैधमापन शास्त्र कार्यालयाचा निरीक्षक ज्ञानदेव सोपान शिंबरे यास लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी बुधवार, २० फेब्रूवारी रोजी त्याच्या कार्यालयातच रंगेहाथ पकडले.येथील एका ४७ वर्षीय तक्रारदाराने केलेल्या तक्रारीवरून बुधवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. वैध मापन शास्त्र,अकोला विभाग - २ चा निरीक्षक ज्ञानदेव श्ािंबरे याने तक्रारदाराकडे व्यवसाय करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात सात हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदारास ही रक्कम देणे मान्य नसल्यामुळे त्याने यासंदर्भात लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अकोला कार्यालयात तक्रार दिली. या तक्रारीची पडताळणी सोमवार, १८ फेब्रूवारी रोजी करण्यात आली. तक्रारीत तथ्य आढळून आल्यानंतर एसीबीच्या अधिकारी बुधवार, २० फेब्रूवारी रोजी वैधमापन शास्त्र कार्यालयात सापळा रचला. यावेळी पंचासमक्ष ज्ञानदेव शिंबरे याने तक्रारदाराकडून स्विकारलेली लाचेची सात हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई एलसीबीचे पोलीस उपअधीक्षक संजय गोर्ले, पोलीस निरीक्षक ईश्वर चव्हाण यांच्यासह गजानन दामोदर, सुनिल राऊत, राहुल इंगळे, सुनील येलोने, सचिन धात्रक, निलेश शेंगोकार, प्रविण कश्यप यांनी केली.
वैधमापन शास्त्र कार्यालयाचा निरीक्षक सात हजाराची लाच घेताना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 4:20 PM