निंबाफाटा : बाळापूर तहसीलअंतर्गत येत असलेल्या बोरगाव वैराळे येथील स्वस्त धान्य दुकानातून मोफत धान्यवाटप योजना केंद्र सरकार व राज्य सरकार राबवत असून, या योजनेत वाटप होणाऱ्या धान्याचे बिल न मिळणे व लाभार्थींना मिळणारे धान्य कमी मिळत असल्याच्या अनेक तक्रारीचे कथन गावकऱ्यांनी पुरवठा निरीक्षक मोहन कोल्हे यांच्यासमोर कथन केल्या. या तक्रारींची लिखित स्वरूपात नोंद पुरवठा निरीक्षक कोल्हे यांनी घेतली असून, या सर्व तक्रारीची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे यावेळी पुरवठा निरीक्षक मोहन कोल्हे यांनी सांगितले.
बोरगाव वैराळे येथील स्वस्त धान्य दुकानदार व्ही.के. कोकाटे धान्यवाटप केल्यानंतर बिले देत नसल्याच्या अनेक तक्रारी ग्रामस्थांनी स्वस्त धान्य दुकान तपासणीच्या वेळी पुरवठा निरीक्षकांकडे केल्या. दुकानाची तपासणी करताना स्वस्त धान्य दुकानातील दररोज वाटप होणारा साठा, एकूण धान्यसाठा याबाबत सूचना फलक दर्शनी भागात लावण्यात आला नाही. गावात धान्य वितरणाची माहिती दिली जात नाही आदींबाबत ग्रामस्थांनी पुरवठा निरीक्षक मोहन कोल्हे यांच्याकडे तक्रारी केल्या. याबाबत चौकशी केली जाणार असून, धान्य वितरणात अनियमितपणा आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल, तसेच धान्य वितरण केल्यानंतर बिले दिली जात नाही, याची चौकशी करण्यात येणार असल्याचे पुरवठा निरीक्षक मोहन कोल्हे यांनी सांगितले. यावेळी सरपंच कल्पना विनायक वैराळे, उपसरपंच राजेश्वर वैराळे, ग्रामपंचायत सदस्य श्रीकृष्ण वेते, तलाठी काकडे, कोतवाल राजू डाबेराव, पांडुरंग बाहकर, ज्ञानेश्वर वैराळे, साहेबराव शेळके, पुरुषोत्तम ठाकरे, सोपान वैराळे, पुंजाजी अमरावते आदींसह ग्रामस्थ हजर होते.