नितीन गव्हाळे, अकोला: जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. ही बाब बाळापूर पंचायत समितीचे उपसभापती धनंजय दांदळे यांना शाळा भेटीदरम्यान लक्षात आली. त्यांनी शाळेला शिक्षक मिळावा, यासाठी प्रयत्न केले; परंतु शिक्षक मिळाला नाही. शाळेतील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, या दृष्टिकोनातून त्यांनीच पुढाकार घेत, उच्चशिक्षित असलेल्या त्यांच्या पत्नीला शाळेवर विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पाठविले. गत काही दिवसांपासून पं. स. उपसभापतीच्या पत्नी विद्यार्थ्यांना गणित, मराठी विषयांसोबत इतर विषयांचे धडे देत आहेत.बाळापूर तालुक्यातील दधम हे पूर्णत: आदिवासी गाव. येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्याही उत्तम; परंतु शिक्षकाचे एक पद या ठिकाणी रिक्त असल्याने, विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. नवनियुक्त पंचायत समिती उपसभापती धनंजय दांदळे यांनी शाळेला भेट दिल्यावर ही बाब त्यांच्या लक्षात आली. त्यांनी रिक्त पदावर शिक्षक मिळावा, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठपुरावा केला; परंतु तांत्रिक अडचणींमुळे प्रशासनाला दधम शाळेवर शिक्षक देणे शक्य झाले नाही. विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान पाहून, उपसभापती दांदळे यांनी त्यांच्या उच्चशिक्षित, टीईटी परीक्षा उत्तीर्ण पत्नी मोहिनी दांदळे यांना ही बाब सांगितली. त्यांनीही लगेच त्या शाळेवर पाहुणा शिक्षक योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना शिकविण्याची जबाबदारी आनंदाने स्वीकारली. मोहिनी दांदळे या दररोज खिरपुरी येथून दधम जि.प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे द्यायला जातात. विद्यार्थ्यांना गणित, मराठी, इंग्रजी, सामाजिक शास्त्रसारखे विषय शिकवितात. एका लोकप्रतिनिधी आणि त्याच्या पत्नीने विद्यार्थ्यांसाठी केलेला हा विचार प्रेरणादायी तर आहेच, शिवाय आदर्श घेण्यासारखा आहे. शिक्षकांअभावी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात. शिक्षक उपलब्ध होत नाही. अशावेळी अनेकदा आजूबाजूला उच्चशिक्षित युवक, लोकप्रतिनिधींचे घरातील मुले, मुली, सुना उच्चशिक्षित असलेल्या दिसून येतात; परंतु या विद्यार्थ्यांच्या शिक्षणापासून कोणी पुढाकार घेत नाही. या दांदळे दाम्पत्यापासून आदर्श घेतला तर एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही. गरोदर असूनही जातात शिकवायला!पं.स. उपसभापती धनंजय दांदळे यांच्या पत्नी मोहिनी दांदळे गरोदर असून, दररोज शाळेत विद्यार्थ्यांना शिकवायला जातात. प्रकृतीची चिंता न करता, केवळ विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध व्हावे, या उदात्त हेतूने शाळेत शिक्षण देत आहेत. मोहिनी दांदळे यांचे एमए, डीएड आणि एमबीएपर्यंत शिक्षण झाले आहे. एवढेच नाही तर त्या दोन्ही सीईटी, टीईटी परीक्षा उत्तीर्ण आहेत. येत्या शिक्षक भरतीमध्ये त्यांची शिक्षक म्हणून निवड होणार आहे.