- प्रशांत विखे (तेल्हारा, जि.अकोला)
अल्प पाऊस आणि रोगराईच्या आक्रमणामुळे शेती परवडत नसल्याचे चित्र सध्या तेल्हारा तालुक्यात आहे. अशात शेतीला मशरूमच्या व्यवसायाची जोड देऊन विलास कुमटे या शेतकऱ्याने आर्थिक प्रगती साधली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी विलास कुमटे मशरूम शेतीचा प्रयोग करून प्रेरणादायी ठरला आहे. व्यवसायात तेजी आल्याने मशरूमचे उत्पन्न वाढवून स्वत:ची कंपनी स्थापन करून मशरूमपासून बनणारी वेगवेगळी उत्पादने तयार करण्याचा मानस विलास कुमटे यांनी व्यक्त केला.
विलास कुमटे यांच्याकडे जेमतेम ५ एकर शेती. त्यात दुष्काळ असल्याने घरची जेमतेम परिस्थिती; यामुळे त्यांना शेतीसोबत काय जोडधंदा करावा असा प्रश्न पडला होता. मशरूम लागवडीबाबत त्यांनी ऐकले होते, परंतु याबाबत व्यवस्थित मार्गदर्शन त्यांना मिळत नव्हते, मित्राकडून मशरूमच्या शेतीबद्दल त्यांना माहिती मिळाली; पण ती परिपूर्ण नसल्याने एका कृषीच्या जाणकाराने त्यांना बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये मशरूम लागवडीबाबत प्रशिक्षण दिले जाते याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी तेथे जाऊन चौकशी केली. नंतर स्वत: तेथे राहून मशरूम लागवडीचे प्रशिक्षण घेतले.
सोबतच त्यांनी पत्नीलाही प्रशिक्षण दिले. त्यानंतर शेतातील सोयाबीनचे कुटार जमा करून घरातच मशरूम लागवडीचा प्रयोग सुरू केला. त्यात यश मिळाले म्हणून स्वत: त्याचे मार्केटिंग करून फ्रेश मशरूम, वाळलेले मशरूम, मशरूम पावडर याची विक्री सुरू केली. अत्यंत कमी खर्चामध्ये ३०० रुपयांच्या मशरूम बोन्समध्ये १२ हजार रुपयांचे उत्पन्न ४५ दिवसांत मिळत असल्याने बेडमध्ये होणाऱ्या मशरूमची विलासने संख्या वाढविली. आज विलासने ८० ते १०० बेडची व्यवस्था केली असून, कुटुंबातील पत्नी, मुलगा, हे या कामाला सहकार्य करीत आहेत.
विलास स्वत: याची मार्केटिंग करून विक्री करीत आहे. शेतीला हा जोडधंदा असल्याने विलास यांना व्यवसाय वाढवायचा आहे. त्याकरिता मोठे टिनशेड व वातानुकूलित यंत्रणा आवश्यक आहे. मात्र, भांडवल नसल्याने घरातच फाऱ्या व बोंदऱ्या लावून त्यावर पाणी फवारून २५ डिग्री से. तापमान मेन्टेन करीत आहे. दीड महिन्यात ४० हजार रुपयांचे उत्पन्न मशरूमच्या माध्यमातून विलास घेत आहे.
विलास केवळ मशरूम उत्पादनावरच समाधान मानणार नसून कर्जाच्या माध्यमातून आर्थिक भांडवल उभारून स्वत:ची कंपनी टाकण्यासाठी त्याची धडपड सुरू आहे. या माध्यमातून मशरूमपासून पावडर, वड्या, पापड, सूप हे उत्पादन तयार करून सरळ उत्पादन ते विक्री स्वत: करणार आहे. त्यामुळे खरोखरच विलासचा हा रोजगार इतर शेतकऱ्यांकरिता प्रेरणादायी आहे. याकरिता कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद येथील कृषी अधिकारी ज्योती बोबडे, तालुका कृषी अधिकारी मिलिंद वानखडे, कृषी सहायक बोचरे, आत्मा समितीचे नेमाडे यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभल्यानेच हे शक्य झाले, असे विलास कुमटे यांनी सांगितले.