अकोला: इन्स्पायर अवार्ड शालेय मुलांमध्ये सृजनशील आणि रचनात्मक विचारांची संस्कृती विकसित करण्यासोबतच, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सामाजिक गरजांना पूर्ण करण्याच्या दृष्टीने या प्रदर्शनाचे आयोजन म्हणजे उद्याचा विकसित भारत घडविण्याकरिता एक महत्त्वपूर्ण पाउल आहे, असे विचार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांनी व्यक्त केले.सातवे जिल्हास्तरीय इन्स्पायर अवार्डच्या समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. भारत सरकार विज्ञान व तंत्रज्ञान विभाग नवी दिल्ली महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मुंबई, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर व शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालय जिल्हा परिषद अकोलाच्या वतीने इन्स्पायर अवार्ड योजना सन २०१७-१८ अंतर्गत पुरस्कार विजेत्या विद्यार्थ्यांचे सातवे जिल्हास्तरीय प्रदर्शन बी.आर. हायस्कूल येथे आयोजित केले होते. यामध्ये अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यातील बाल वैज्ञानिक सहभागी झाले होते.समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती होते. विशेष अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. पी.व्ही. जाधव, शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, उपशिक्षाधिकारी दिनेश तरोळे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे प्रेमकुमार सानप, दिनेश तायडे, कल्पना धोत्रे, प्रा.डॉ. दिलीप बदुकले, गजानन चौधरी, मंदाकिनी तळोकार, दिनकर गायकवाड, मेघा देशपांडे, विनोद मानकर, अरुण शेगोकार, प्रा.डॉ. रवींद्र भास्कर व्यासपीठावर विराजमान होते.प्रदर्शनामध्ये अकोला जिल्ह्यातील ५१, वाशिम जिल्ह्यातील ७२ आणि बुलडाणा जिल्ह्यातून ३४ मॉडेल मांडलेले होते. यामधून अकोला मधील ५, वाशिमचे ७ आणि बुलडाणा जिल्ह्यातून ३ मॉडेलची निवड राज्यस्तरीय प्रदर्शनाकरिता करण्यात आली. यामध्ये यश अग्रवाल अकोला, अविनाश पिसे अकोला, आकांक्षा डोंगरे चंडिकापूर, विश्वजित जवंजाळ बार्शीटाकळी, दानिश शाह पातूर, कुणाल निंबाळकर जलम, प्राची डोसे मलकापूर, सौरभ गुंगे मेहकर, ऋषिकेश राठोड सुतखेडा, अवंती खाडे कारंजा, अभिषेक इंगळे चवड, ऋत्विक घोगरे पार्डी, सलोनी जाधव तिवडी, ज्ञानेश्वरी लुले पारवा, काजल भगत मंगरू ळपीर यांचा समावेश आहे. राज्यस्तरावर निवड झालेल्या या चिमुकल्या वैज्ञानिकांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन किरण चव्हाण यांनी केले. आभार अरुण शेगोकार यांनी मानले.