अकोला : बाळापुर तालुक्यातील पारस येथे होऊ घातलेला सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करून त्याऐवजी शासनासोबत झालेल्या भूसंपादन करारनामाप्रमाणे ६६० मेगा वॅट क्षमतेचा औष्णिक ऊर्जा प्रकल्प स्थापीत करण्यात यावा या मागणीसाठी सर्वपक्षीय सौर ऊर्जा प्रकल्पविरोधी कृती समितीने मंगळवारी (१९ डिसेंबर) येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले.
शासनाने ६६० मेगा वॅट विस्तारित औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी २०११ मध्ये पारस येथे ११०.९१ हेक्टर जमीन संपादीत केली आहे. परंतु, आता या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा घाट घातल्या जात असल्याचा आरोप कृती समितीने जिल्हाधिकऱ्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यात कुठल्याही प्रकारची रोजगार निर्मित होणार नसल्याचा दावाही कृती समितीने केला आहे. औष्णिक विद्युत प्रकल्प उभारल्यास रोजगार निर्मितीच्या शक्यता वाढतील.
सौर ऊर्जा प्रकल्पाला सर्व जनतेचा व सर्व पक्षांचा विरोध आहे. त्यामुळे प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करून त्याऐवजी औष्णिक ऊर्जा प्रकल्प स्थापीत करण्यात यावा. अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असे कृती समितीच्या निवेदनात म्हटले आहे. आंदोलनस्थळी माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, माजी आमदार बळीराम सिरस्कार, काँग्रेस नेते प्रकाश तायडे, समाजकल्याण सभापती आम्रपाली खंडारे, जि. प. सदस्य प्रगती दांदळे, माजी जि. प. सदस्य रामदास लांडे, डॉ. दादाराव लांडे, कृती समितीचे श्रीकृष्ण इंगळे यांच्यासह पारस, काेळासा, जोगलखेड, हसनापूर, मांडोली येथील सरपंच उपस्थित होते.