अकोला, दि. २ : विद्येची आराध्य दैवत असलेल्या गणरायाचे आगमन व शिक्षक दिन असा दुहेरी संयोग यंदा जुळून आला आहे. हा दुग्धशर्करा योग जुळून आला असल्याने, यंदा केवळ विघ्नहर्त्या गणरायाची घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणीच नव्हे, तर शहरातील विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रतिष्ठापना केली जाणार आहे.गणेशोत्सवाचे आगमन म्हणजे आनंदोत्सवच असतो. गेल्या वर्षी बाप्पाला निरोप देताना पुढील वर्षी लवकर या, असे साकडे घालणारे सारेच गणेशभक्त नवीन वर्षात त्याच्या आगमनाची प्रतीक्षा करीत असतात. ही प्रतीक्षा आता संपली असून, सोमवार, ५ सप्टेंबर रोजी घरोघरी व सार्वजनिक मंडळांतर्फे श्रींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. विद्येची आराध्य देवता असलेल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन यंदा शिक्षकदिनीच होत आहे. विद्यार्थ्यांना पदोपदी यशाचा मार्ग दाखविणार्या शिक्षकांप्रती स्नेहभाव आणि सौहार्द व्यक्त करण्याचा हा दिवस असल्याने, यंदा गणेश चतुर्थीचा दिवस हा दुग्धशर्करा योग असल्याचे मानले जात आहे. दरवर्षीप्रमाणे यंदासुद्धा शहरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये शिक्षक दिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांसह गणरायाची स्थापना केली जाणार असल्याची माहिती आहे.
विद्येच्या आराध्य देवतेची प्रतिष्ठापना; शिक्षक दिनाचा संयोग
By admin | Published: September 05, 2016 2:48 AM