अकोला : कमी दिवसात उत्पन्न हाती येईल, अशा नवनवीन वाणांकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात यावर्षी लवकर येणाऱ्या सोयाबीनचे क्षेत्र अधिक असून, सध्या या सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू आहे. त्यात भावही ११ हजार प्रतिक्विंटलच्या आसपास असल्याने लवकर येणाऱ्या सोयाबीनने शेतकरी मालामाल होत असल्याचे समाधानकारक चित्र आहे.
जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून सोयाबीन पिकाला ऐन सोंगणीच्या हंगामात पावसाचा फटका बसत आहे. शिवाय सोयाबीनचे तेच ते वाण घेतल्याने उत्पादनावरही परिणाम होतो. त्यामुळे यंदा अनेक शेतकऱ्यांनी लवकर व मध्यम कालावधीत येणाऱ्या वाणाची लागवड केलेली आहे. कमी दिवसात येणारी सोयाबीन सोंगणी सध्या सुरू असून शिवाय बाजार समितीत भावही १० ते ११ हजार रुपये प्रतिक्विंटल असल्याने या शेतकऱ्यांना हे सोयाबीन अडचणीत आर्थिक आधार देणारे ठरत आहे.
झटपट येणारे सोयाबीन
राज्यातील कृषी विद्यापीठांच्या संशोधनामुळे १०० ते १०५ दिवसांमध्ये येणारे सोयाबीनचे वाण विकसित झाले आहे. हे वाण झटपट येत असल्याने सोयाबीनच्या दरवाढीचा फायदा होत आहे.
मध्यम कालावधीत येणारे सोयाबीन
सोयाबीनचे मध्यम कालावधीत येणारे वाण १०५ ते १२० दिवसांमध्ये येते. या खरिपात मध्यम कालावधीतील सोयाबीन अद्याप बाजार समितीत येण्यास काही दिवस बाकी आहे.
जास्त कालावधीत येणारे सोयाबीन
सोयाबीनच्या काही वाणांना जास्त कालावधी लागतो. या सोयाबीनला चार महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
शेतकरी म्हणतात...
सुरुवातीला पेरणी झालेल्या सोयाबीनची सोंगणी सुरू आहे. काही शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजार समितीतही आले आहे. त्याला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे यंदाही सोयाबीनला योग्य दर मिळण्याची अपेक्षा आहे.
- संतोष ताले
काही वर्षांपासून पावसामुळे सोयाबीनचे नुकसान होत आहे. यंदा पीक चांगले असून, कमी दिवसात येणाऱ्या सोयाबीनला चांगले दर मिळत आहे. काही दिवसांमध्ये मध्यम कालावधीतील सोयाबीन बाजारात येईल.
- राजेश देशमुख
सद्य:स्थितीत सोयाबीनला बाजारात चांगला दर मिळत आहे. काही शेतकऱ्यांनी कमी कालावधीत येणारे वाण पेरल्याने त्या शेतकऱ्यांना या दराचा फायदा होत आहे.
- डॉ. कांतप्पा खोत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
जिल्ह्यात वाढला सोयाबीनचा पेरा
वर्ष पेरा (हेक्टरमध्ये)
२०१७ १४२९८५
२०१८ १४६६८३
२०१९ १५२२८२
२०२० १७०८५८
२०२१ २३०२५५