संतोष येलकर
अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणू संसर्गाचा कहर वाढतच असून, ‘होम क्वारंटाइन’ कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्तींकडून नियमांचे पालन होत नसल्याने, जिल्ह्यातील १६९ गावांत ‘होम क्वारंटाइन’ २ हजार १३३ रुग्णांचे आता संस्थात्मक विलगीकरण करण्यात येणार आहे. रुग्णांच्या संस्थात्मक विलगीकरणाची व्यवस्था संबंधित ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामध्ये ‘होम क्वारंटाइन’ कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्तींकडून नियमांचे पालन करण्यात येत नसल्याने, ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग आणि कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे ‘होम क्वारंटाइन’ ऐवजी संस्थात्मक विलगीकरण करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी २२ मे रोजी जिल्ह्यातील संबंधित यंत्रणांना दिले. त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागात ‘होम क्वारंटाइन’ रुग्णांचे १६९ गावांमध्ये संस्थात्मक विलगीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सातही तालुक्यात १६९ गावांमध्ये ‘होम क्वारंटाइन’ २ हजार १३३ रुग्णांचे संस्थात्मक विलगीकरण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, संबंधित ग्रामपंचायतींमार्फत ‘होम क्वारंटाइन ’ रुग्णांचे संस्थात्मक विलगीकरण करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
संस्थात्मक विलगीकरणाची अशी
आहेत गावे आणि रुग्णसंख्या !
तालुका गावे रुग्ण
अकोला २४ ३२३
अकोट २४ ३४९
बाळापूर ३४ ३५३
बार्शिटाकळी १७ ३४६
मूर्तिजापूर १९ २२०
पातूर २० ३०९
तेल्हारा २० ३३३
...................................................................
एकूण १६९ २१३३
गावांतील ‘या ’ ठिकाणी होणार
संस्थात्मक विलगीकरण व्यवस्था !
जिल्ह्यातील १६९ गावांमध्ये होम क्वारंटाइन कोरोनाबाधित रुग्णांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात येणार आहे. त्यामध्ये संबंधित गावांत जिल्हा परिषद शाळा, खासगी शाळा, महाविद्यालये, समाजमंदिर, धर्मशाळा, वसतिगृह इत्यादी इमारतींमध्ये ग्रामपंचायतींमार्फत संस्थात्मक विलगीकरणाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागात ‘होम क्वारंटाइन ’ रुग्णांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात येत आहे. त्यामध्ये १६९ गावांत २ हजार १३३ रुग्णांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात येत आहे. संस्थात्मक विलगीकरणाची व्यवस्था संबंधित ग्रामपंचायतींकडून करण्यात येत आहे.
डाॅ. सुरेश आसोले
जिल्हा आरोग्य अधिकारी