अकोला: गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती व महापालिकेच्या संयुक्त पाहणीत कौलखेडमधील राधानगरी येथे नव्यानेच सुरू झालेल्या नारायणा ई टेक्नो स्कूलजवळ शासन मान्यता, खाते मान्यता आणि युडायस संदर्भातील कुठलेही अधिकृत पत्र प्राप्त नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली. शाळेला प्राथमिक शिक्षण विभागाने कागदपत्रे सादर करण्यासाठी सात दिवसांचा अवधी दिला. त्यानंतरही शाळा व्यवस्थापनाने कोणतीही अधिकृत कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे प्राथमिक शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांनी शाळा बंद करण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे लाखों रूपये शुल्क भरून नव्यानेच प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे कसे? असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. काही दिवसांपूर्वी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेत भेट देऊन तपासणी केली असता, गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शाळा व्यवस्थापनाला शासन मान्यता आहे का? प्राथमिक शिक्षण विभागाकडून युडायस क्रमांक घेतला का? जिल्हानिहाय खाते मान्यता घेतली का? घेतली असेल तर त्याची कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. परंतु शाळा व्यवस्थापनाने कोणतीही कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे शाळेला कागदपत्रे सादर करण्यासाठी ७ दिवसांचा अवधी देण्यात आला. मात्र, त्यानंतरही कागदपत्रे सादर करण्यात आली नाहीत. अखेर शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांनी शैक्षणिक सत्र २०२४-२५ या वर्षामध्ये नारायणा ग्रुप ऑफ स्कूलने शासनाची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृत नारायणा ई टेक्नो स्कूल सुरु केल्याचे गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या अहवालानुसार शाळा बंद करण्याचा आदेश दिला आहे. तशी नोटीसही नारायणा ग्रुप ऑफ स्कूलच्या व्यवस्थापक व मुख्याध्यापकांना बजावली आहे. याबाबत शाळेच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधला, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.बजावलेली नोटीस काय म्हणते?शासनाची, शिक्षण विभागाची कोणतीही परवानगी नसताना, शाळा सुरु करणे हे नियमबाह्य आहे. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ च्या कलम १८ नुसार शाळेने सात दिवसांच्या आत शाळा बंद करून तसा अहवाल शिक्षणाधिकारी कार्यालयास सादर करावा. शिक्षणाधिकाऱ्यांनी नोटीसमध्ये म्हटले आहे.शैक्षणिक सत्र २०२४-२५ या वर्षामध्ये नारायणा ग्रुप ऑफ स्कूलने शासनाची कोणतीही पूर्व परवानगी न घेता, अनधिकृत नारायणा ई टेक्नो स्कूल सुरु केल्याची बाब गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या पाहणीत व अहवालात आढळून आली आहे. कोणत्याही परवानगी शिवाय शाळा सुरु करणे हे नियमबाह्य आहे. त्यामुळे व्यवस्थापनाला शाळा बंद करण्याची नोटीस बजावली आहे.-रतनसिंग पवार, शिक्षणाधिकारी प्राथमिक
नारायणा ई टेक्नो स्कूल बंद करण्याचे शिक्षणाधिकाऱ्यांचे निर्देश
By नितिन गव्हाळे | Published: July 03, 2024 12:05 AM