अकोला: माध्यमिक शिक्षण विभागाने खासगी शाळांसोबत अल्पसंख्याक शाळांकडून अतिरिक्त शिक्षकांची माहिती मागविली होती. ही माहिती प्राप्त झाली आहे; परंतु अतिरिक्त शिक्षकांची माहिती समायोजन पोर्टलवर टाकणे गरजेचे असल्याने, ज्या शाळांनी अतिरिक्त शिक्षकांनी माहिती पोर्टलवर भरली नाही, अशा शाळांनी तातडीने माहिती भरण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिले आहेत.अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याच्या दृष्टिकोनातून गत महिनाभरापासून माध्यमिक शिक्षण विभागाने शाळांमधील अतिरिक्त शिक्षक, रिक्त पदे, विषय आणि आरक्षणाची माहिती मागविली होती. त्यानुसार शिक्षण विभागाकडे अल्पसंख्याक आणि बिगर अल्पसंख्याक शाळांमधील एकूण १२६ अतिरिक्त शिक्षकांची माहिती सादर करण्यात आली. यासोबतच रिक्त पदांचीसुद्धा माहिती देण्यात आली. ही माहिती शासनाच्या समायोजन पोर्टलवर देणे गरजेचे आहे; परंतु जिल्ह्यातील अनेक शाळांनी अतिरिक्त शिक्षकांची माहिती समायोजन पोर्टलवर भरली नसल्याचे समोर आले आहे. ज्या शाळांना अतिरिक्त शिक्षकांची माहिती भरली नसेल, त्यांनी त्यांच्या लॉगिनवरून तातडीने ही माहिती भरावी, समायोजन पोर्टलवर अतिरिक्त शिक्षकांची माहिती दिली नसल्यामुळे समायोजनासंबंधी अडचणी निर्माण होऊ शकतात. अतिरिक्त शिक्षकांची माहिती सादर केल्यास शिक्षकांचे १00 टक्के समायोजन करणे सोयीचे ठरेल. त्यामुळे शाळांनी समायोजन पोर्टलवर ही माहिती भरावी, असे निर्देश शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)