शहरांमधील वाढती लाेकसंख्या व दुचाकी, चारचाकी वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस हाेणारी वाढ पाहता महापालिका प्रशासनाच्यावतीने पुरविल्या जाणाऱ्या मूलभूत साेयीसुविधांवर ताण पडत आहे. मनपा क्षेत्रात पार्किंगसाठी राखीव असलेल्या जागांवर लघु व्यावसायिकांनी अनधिकृतपणे कब्जा केल्यामुळे वाहनचालकांना नाईलाजाने रस्त्यालगत जागा दिसेल त्याठिकाणी वाहने उभी करावी लागत आहेत. अशा स्थितीत मुख्य रस्ते, पूल, उड्डाण पुलाखाली बेकायदेशीरपणे साेडून दिलेल्या वाहनांमुळे वाहतुकीच्या समस्येत अधिकच भर पडली आहे. शिवाय यामुळे अपघातांची संख्या वाढली असल्याचे चित्र समाेर आले आहे. महापालिका क्षेत्रातील अशा बेवारस वाहनांमुळे वाहतूक शाखा पाेलिसांसमाेर नानाविध अडचणी निर्माण हाेत आहेत. याप्रकाराची दखल घेत शासनाने शहरांमध्ये बेवारस वाहनांना हटविण्यासाठी महापालिकांना निर्देश दिले आहेत. त्यासाठी ठाेस कालमर्यादेत कारवाईसाठी विशेष माेहीम राबविण्याची सूचना आहे.
आयुक्तांकडे संनियंत्रण
कारवाईचे संनियंत्रण मनपा आयुक्तांनी करण्याचे निर्देश आहेत. बेवारस वाहनांचे प्रभागनिहाय सर्वेक्षण केल्यानंतर संबंधित वाहनांवर सात दिवसांचा कालावधी दिलेली नाेटीस लावून त्याचे छायाचित्र काढणे भाग आहे. या कालावधीत जी वाहने हटवली जाणार नाहीत,अशा वाहनांना हटवल्या जाणार आहे. याबाबतची माहिती पाेलीस प्रशासन व परिवहन विभागाला द्यावी लागणार आहे.