अकोला: रेल्वे स्टेशनवरील पार्सल विभागालगतची ‘आरएमएस’ची इमारत खाली करण्यात येणार आहे. या इमारतीच्या जागेवर रेल्वेकडून नवीन सुविधा उपलब्ध होणार आहे. ही इमारत खाली करण्याचे निर्देश मंगळवारी भुसावळ रेल्वे मंडळाचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा यांनी रेल्वे प्रशासनाला दिले. ‘पे अॅण्ड युज’ स्वच्छतागृहाचा वापर करण्यासाठी कोणतेही शुल्क वसूल न करण्याचे त्यांनी स्पष्ट केले.मध्य रेल्वेचे महाप्रबंधक डी. के. शर्मा हे २८ डिसेंबर रोजी रेल्वे स्टेशनची पाहणी करण्यासाठी येणार आहेत. त्यांच्या दौऱ्याचे नियोजन आणि तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून कामाचा आढावा घेण्यासाठी भुसावळ रेल्वे मंडळाचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा मंगळवारी अकोल्यात आले. त्यांनी रेल्वे स्टेशन परिसराची पाहणी केली. १५ डिसेंबर रोजी भुसावळ डीआरएम आर. के. यादव यांनी त्यांच्या दौºयात मुख्य प्रवेशद्वारातून चारचाकी वाहनांच्या एक्झिटचे दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही, याची तपासणी केली तसेच त्यांनी कार पार्किंग कंत्राटदाराकडे चौकशी केली आणि रेल्वे प्रशासनाला दोन्ही मुख्य प्रवेशद्वारांच्या दिशांना एक्झिटचा फलक लावण्याचा आदेश दिला. रेल्वे स्टेशनवरील स्वच्छता कामाचाही त्यांना आढावा घेतला आणि पे अॅण्ड युज स्वच्छतागृहात येणाºया प्रवाशांकडून कोणतेही शुल्क वसूल करू नये, असे निर्देश दिले आणि स्वच्छतागृहाजवळील हिरकणी कक्षसुद्धा हटविण्यास सांगितले. त्यावेळी त्यांच्यासोबत मुख्य वाणिज्य निरीक्षक ए. सी. छापोरकर, प्रकाश ठाकूर, सुबोधकुमार, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी जीवन चौधरी, स्टेशन प्रबंधक ब्रजेशकुमार, वाणिज्य निरीक्षक महेशचंद्र निकम, अकोला आरपीएफचे आर. एन. यादव व मगर उपस्थित होते.