जिल्ह्यात अतिवृष्टी व पुराच्या पाण्यामुळे माेठ्या प्रमाणात शेती खरडून गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांची झालेली वित्तहानी भरून काढण्यासाठी विमा कंपन्यांकडून तातडीने पंचनामे करण्याची गरज निर्माण झाली आहे. शासनाने २३ जुलैपर्यंत विमा हप्त्याची रक्कम भरण्यासाठी मुदत वाढवून दिली हाेती. यावेळी झालेली अतिवृष्टी, खंडित झालेल्या विद्युत पुरवठ्यामुळे असंख्य शेतकरी विमा हप्ता भरू शकले नाहीत. पीक नुकसानीची माहिती विमा कंपनीला कोणत्या स्वरूपात कधी व कशी देण्यात यावी, तसेच कोणत्या मुदतीत देण्यात यावी, याबाबत शेतकरी अनभिज्ञ आहेत. त्यामुळे कृषी विभागाने, तसेच विमा कंपनीने शेतकऱ्यांसोबत संपर्क व संवाद साधून माहिती देणे अत्यंत गरजेचे झाल्याचा मुद्दा आ. सावरकर यांनी पत्रात नमूद केला आहे. जेणेकरून आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचा मोबदला लवकर मिळेल. विमा कंपन्यांबाबत शेतकऱ्यांना अत्यंत वाईट अनुभव असल्याने संबंधित कंपन्यांना तातडीने कामाला लावण्याची सूचना आ. सावरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.
महसूल व मनपाने संयुक्त सर्व्हे करावा!
अकाेला पश्चिम विधानसभा मतदारसंघात अतिवृष्टी व पुराचे पाणी असंख्य घरांमध्ये व बाजारपेठेत शिरल्याने माेठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. यामध्ये जुन्या शहरातील बहुतांश भाग प्रभावित झाला असून, महसूल व महापालिका प्रशासनाने संयुक्त सर्व्हे करून पंचनामे करावेत, अशी सूचना भाजपचे ज्येष्ठ आमदार गाेवर्धन शर्मा यांनी जिल्हाधिकारी निमा अराेरा, निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांना केली आहे.