आशिष गावंडे
अकोला: मागील अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे उकाड्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहे. यात भरीस भर ऐन श्रावण महिन्यात महावितरण कंपनीकडून जुने शहरात अघाेषित भारनियमन केले जात आहे. महावितरणने अघाेषित भारनियमन तातडीने बंद करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी शिवसेनेच्या (ठाकरे गट) वतीने विद्यूत भवनमध्ये ठिय्या आंदाेलन छेडन्यात आले.
मागील काही दिवसांपासून शहरात देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली महावितरण कंपनीकडून रात्री अघाेषित भारनियमन केले जात आहे. सणासुदीचे दिवस लक्षात घेता भारनियमन बंद करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदाेलन छेडले हाेते. यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.
...तर कार्यालयाला कुलूप लावणार
पावसाने दडी मारल्यामुळे वातावरणात उकाडा वाढला आहे. यामुळे जीवाची लाहीलाही हाेत असताना वीज कंपनीकडून भारनियमन केले जात आहे. हा प्रकार ताबडताेब बंद न केल्यास कार्यालयाला कुलूप लावणार असल्याचा इशारा राजेश मिश्रा यांनी दिला.