अकोला: सर्वोपचार रुग्णालयातील काही वार्डातही पाणी शिरल्याने रुग्णांची चांगलीच दैनावस्था झाली. पाणी साचल्याने अतिदक्षता विभाग पूर्णत: जलमय झाला होता. साचलेले पाणी वॉर्डाबाहेर काढण्यासाठी कर्मचाऱ्यांसह रुग्णनातेवाईकांची रात्रभर मोठी कसरत झाल्याचे चित्र दिसून आले. प्रामुख्याने अतिदक्षता विभाग असलेल्या वॉर्ड क्रमांक आठ सोबतच वॉर्ड क्रमांक सहा आणि सात मध्येही पावसाचे पाणी गुढघ्या ऐवढे शिरले होते. मध्यरात्रीनंतर वॉर्डात साचलेल्या पाण्याचा स्तर वाढू लागल्याने रुग्णांसोबतच त्यांच्या नातेवाईकांमध्येही भीतीचे वातावरण पसरू लागले. वैद्यकीय उपकरणे, औषधांसह इतर महत्त्वाचे साहित्यांचा पाण्यापासून बचाव करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. तसेच रुग्णांचा पाण्यापासून बचाव करण्यासाठी त्यांना खाटांवर ठेवण्यासाठी नातेवाईकांनी कसरत केली.
वॉर्ड क्रमांक ६, ७ ही पाण्यात
अतिदक्षता विभागासोबतच वॉर्ड क्रमांक सहा आणि सातमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. त्यामुळे या वॉर्डातील रुग्णांचीही चांगलीच तारांबळ उडाली. शिवाय, या वॉर्डाकडे जाणाऱ्या मार्गातही पाणी साचल्याचे दिसून आले. गुरुवारी सकाळी एक्स रे काढण्यासाठी रुग्णांना पाण्यातच उभे राहावे लागल्याचे चित्र दिसून आले.