अकोला: महावितरणच्या अकोला मंडळातील ग्राहकांशी प्रत्यक्ष सुसंवाद साधण्याकरिता व त्यांच्या तक्रारी व समस्यांचे निवारण करण्याच्या दृष्टीने बुधवार १ आॅगस्ट रोजी अकोला शहरातील व अकोला मंडळातील सर्वच तालुक्यातील ग्राहकांकरिता उपविभागीय कार्यालयामध्ये विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये अकोला शहरातील ग्राहकांकरिता विद्युत भवन येथील ग्राहक सुविधा केंद्र येथे तर अकोला ग्रामीण, बार्शीटाकळी, पातुर, बाळापुर, अकोटआणि तेल्हारा उपविभागातील ग्राहकांकरिता तेथील उपविभागीय कार्यालय परिसरात शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये वीजबील दुरुस्ती, घरगुती व इतर वर्गवारींची नवीन वीज जोडणी, वाढीव भार, नावामधील बदल-दुरुस्ती, मोबाईल क्र.नोंदणी तसेच इतर सुविधांचा लाभ, माहिती व मार्गदर्शन ग्राहकांना देण्याकरिता हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. येथे ग्राहकांना अर्ज विनामूल्य उपलब्ध राहणार असून ग्राहकांनी त्यांच्या तक्रारी संदभार्तील कागदपत्रे व वीजदेयके सोबत आणावीत. शिबिराच्या दिवशी संबंधित कामाकरिता अकोला शहर विभागातील अभियंते, अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष येथे उपस्थित राहून या संदर्भात मार्गदर्शन करतील. ग्राहकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणच्या अकोला मंडळाकडून करण्यात आले आहे.