लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : धुळे येथील महालक्ष्मी ट्रेडिंग कंपनीचा संचालक असलेल्या कुणाल अग्रवाल याने अकोल्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आशिष एंटरप्राइजेस येथून तब्बल २७ लाख रुपये किमतीचे ९२0 क्विंटल सोयाबीन परस्पर विक्री करून आशिष एंटरप्राइजेसची तब्बल २७ लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी कुणाल अग्रवालविरुद्ध गुन्हा दाखल करून, त्याला गुरुवारी पुण्यातून अटक केली. आरो पीस न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रामअवतार रामवल्लभ लाहोटी यांच्या मालकीचे आशिष एंटरप्राइजेस हे प्रतिष्ठान आहे. या प्रतिष्ठानमधून धुळे येथील महालक्ष्मी ट्रेडिंग कंपनीचा संचालक कुणाल अनिल अग्रवाल याने ९२0 क्विंटल सोयाबीनची आवश्यकता असल्याचे सांगून लाहोटी यांच्या एंटरप्राइजेसमधून तब्बल चार ट्रक म्हणजेच ९२0 क्विंटल सोयाबीनची खरेदी केली. सदर सोयाबीन २७ लाख ७ हजार ५२८ रुपयांचे असून, लाहोटी यांनी अग्रवालला सदर रकमेची मागणी केली. मात्र, कुणाल अग्रवाल याने या सोयाबीनची रक्कम रामअवतार लाहोटी यांना दिली नाही. त्यानंतर ते सोयाबीन दुसर्याच व्यापार्याला परस्पर विक्री करून, २७ लाख रुपये हडप केले. २७ लाख रुपयांचे सोयाबीन विक्री करून, लाहोटी यांची फसवणूक केल्यानंतर कुणाल अग्रवाल हा धुळय़ातून फरार होऊन त्याने पुण्यात मुक्काम ठोकला. या प्रकरणाची तक्रार लाहोटी यांनी २१ ऑक्टोबर रोजी रामदास पेठ पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर आरोपी कुणाल अनिल अग्रवाल याला पुण्यातून अटक केली. त्याला गुरुवारी अकोला येथील जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी आरोपी कुणाल अनिल अग्रवाल याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४२0, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रामदास पेठचे ठाणेदार शैलेष सपकाळ यांनी केली.
चार दिवस घेतला शोधधुळय़ातील रहिवासी कुणाल अग्रवाल याने ९२0 क्विंटल सोयाबीनची परस्पर विक्री करून फरार झाल्यानंतर पुणे गाठले. पोलिसांनी २१ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल केल्यानंतर त्याचा शोध सुरू केला. मात्र, आरोपीचा शोध लागला नाही. गत चार दिवसांपासून आरोपी पुण्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याचा पुण्यात शोध घेऊन अटक केली.