अकोला : वेगाने वाहन चालविणाऱ्यांनी अकोला शहर वाहतूक शाखेच्या इंटरसेप्टर वाहनाचा धसका घेतला आहे. पोलीस अधीक्षक अमोघ गावकर ह्यांचे निर्देशा प्रमाणे शहर वाहतूक निरीक्षक गजानन शेळके यांनी जानेवारी महिन्यात तब्बल ६५८ वाहनांवर कार्यवाही केली आहे.आपल्या देशात साधारणपणे दर वर्षी रस्ते अपघातात जवळपास दीड लाख लोक मृत्यू मुखी पडतात, जखमी होणाऱ्यांची संख्या खुप आहे. त्या पैकी काही लोकांना कायमचे अपंगत्व येते, रस्ते अपघाताला अनेक बाबी कारणीभूत असल्या तरी वेगाने वाहन चालविणे हा अपघात घडण्यासाठी एक प्रमुख कारणं असल्याचे सर्वेक्षणामध्ये समोर आले आह. त्या साठी प्रत्येक मार्गावर किती वेगाने वाहन चालवावे याची वेग मर्यादा निश्चित करण्यात आली आहे; परंतु वेगाची नशा एकदा डोक्यात गेली तर वेगावर नियंत्रण राहत नाही व त्यातूनच गंभीर अपघात घडतात व हकनाक लोक मृत्युमुखी पडतात. यामध्ये तरुणांची संख्या लक्षणीय आहे. हे टाळण्यासाठी वेगात जाणाºया वाहनाच्या वेगाचा अचूक वेध घेण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून वेगाचा वेध घेणारी स्पीडगन असणारे एक नवेकोरे वाहन राज्य शासनाने महामार्ग पोलीस व शहर वाहतूक विभागाला पुरविले आहे. या अत्याधुनिक इंटर सेप्टर वाहनाचा पुरेपूर उपयोग अकोला शहर वाहतूक शाखेने करून पोलीस अधीक्षक अमोघ गावकर ह्यांचे निर्देशा प्रमाणे शहर वाहतूक निरीक्षक गजानन शेळके यांनी जानेवारी महिन्यात तब्बल ६५८ वाहनांवर कार्यवाही केली. आज परिस्थिती ही आहे की इंटरसेप्टर वाहन महामार्गावर दिसताच वाहन चालक कार्यवाही टाळण्यासाठी वाहनाचा वेग हळू करताना दिसत आहेत. आपली वाहने घालून दिलेल्या वेग मर्यादेतच चालवून संभाव्य अपघात टाळावा असे आवाहन पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी वाहन चालकांना केले आहे.
इंटरसेप्टर वाहनाचा धसका; एका महिन्यात ६५८ वाहनांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2020 6:28 PM