अकोला : दक्षिण-मध्य रेल्वे मार्गावरील बार्शिटाकळी-लोहगड या दोन रेल्वे स्थानकांदरम्यान शुक्रवारी सायंकाळी 6.30 वा. १७६४१ काचीगुडा-नरखेड इंटरसिटी एक्सप्रेस मधून एक महिला व एक पुरुष खाली पडले. त्यानंतर, घटनास्थळापासून अर्धा किमी दूरवर जाऊन थांबलेल्या इंटरसिटी एक्सप्रेसने, गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या त्या दोघांना घेण्यासाठी परत अर्धा किमी विरुद्ध दिशेने प्रवास केला.
सायंकाळी 4.45 वा. वाशीम रेल्वेस्थानाकवरून निघालेल्या इंटरसिटी एक्सप्रेसमधून हे दोघे प्रवास करीत होते. बार्शिटाकळी ते लोहगड दरम्यान असलेल्या 92 क्रमांकाच्या रेल्वे फाटकाजवळ हे दोघेजण धावत्या गाडीतून खाली पडले. प्रत्यक्षदर्शींनी घटनेची माहिती रेल्वे गार्डला दिल्यानंतर, गार्डन रेल्वे चालकाशी संपर्क साधून गाडी थांबवली. स्तोवर ही गाडी घटनास्थळापासून अर्धा किलोमीटर लांब गेली होती. गाडीतून खाली पडलेल्या त्या दोघांना ताबडतोब रुग्णालयात हलविता यावे यासाठी रेल्वे चालकाने बार्शिटाकळी व लोहगड या दोन रेल्वे स्थानकांच्या स्टेशन मास्तरांशी संपर्क साधून घटनास्थळापासून दूर गेलेली गाडी परत अर्धा किलोमीटर मागे घेतली. गंभीर जखमी अवस्थेतील त्या दोघांना घेऊन इंटरसिटी एक्सप्रेस 7.15 च्या दरम्यान अकोल्याकडे निघाली.
दरम्यान जखमींना रुग्णालयात हलविण्यासाठी अकोला रेल्वे स्थानकावर रुग्णवाहिका बोलाविण्यात आली होती. दोघांनाही अकोला सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले आहे. गंभीर जखमींची अद्याप ओळख पटली नसल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी 'लोकमत'ला दिली. धावत्या रेल्वेतून ते दोघे कसेकाय पडले हे गुढ अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, दोघेही शुद्धीवर आल्यानंतर ते स्पष्ट होईल असेही सूत्रांनी सांगितले.
यापूर्वीही घडली होती अशीच घटनायापूर्वीसुद्धा अश्याच प्रकारची घटना गतवर्षात 2017 मध्ये घडली होती. याच दोन रेल्वेस्थानकादरम्यान घडलेल्या त्या घटनेत एक युवक अकोला-काचीगुडा एक्सप्रेस मधून खाली पडला होता. आणि विशेष बाब म्हणजे त्याला वेळेससुद्धा गाडीतून पडलेल्या त्या युवकाचे प्राण वाचविण्यासाठी काचीगुडा एक्सप्रेसने एक किमीचा प्रवास विरुद्ध दिशेने केला होता. वस्मतच्या राहणाऱ्या त्या युवकास तात्काळ वाशिमच्या रुग्णालयात हलविल्यामुळे त्याचे प्राण वाचले होते.