अकोला : चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता करावर व्याजाची आकारणी न करण्याचा निर्णय महापालिकेत सत्ताधारी भाजपाने घेतला खरा; मात्र १ एप्रिल ते २४ सप्टेंबर या कालावधीत व्याजाची रक्कम जमा करणाºया अकोलेकरांना भाजपाने वाºयावर सोडल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी व्याजाची रक्कम जमा करणाºयांना कोणताही दिलासा नसल्याचे सर्वसाधारण सभेत महापौर विजय अग्रवाल यांनी स्पष्ट केल्यामुळे अकोलेकरांमध्ये पुन्हा नाराजीचा सूर उमटत आहे. भाजपाच्या या निर्णयामुळे प्रशासकीय स्तरावर सावळा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.महापालिकेचे उत्पन्न न वाढविल्यास विविध योजनांसाठी एक छदामही देणार नसल्याची भूमिका राज्य शासनाने घेतली होती. त्यामुळे नाइलाजाने का होईना, आजवर प्रभागातील मतदारांची पाठराखण करणाºया सर्वपक्षीय नगरसेवकांना उत्पन्न वाढीसाठी मालमत्तांच्या पुनर्मूल्यांकनाचा निर्णय घ्यावा लागला. पुनर्मूल्यांकन केल्यानंतर साहजिकच कराच्या रकमेत सुधारित दरवाढ करण्यात आली. १८ वर्षांच्या कालावधीनंतर दरवाढीचा निर्णय घेण्यात आला असला, तरी टॅक्सच्या रकमेत मोठी वाढ झाल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. भाजपाच्या या निर्णयावर काँग्रेस, शिवसेना व भारिप-बहुजन महासंघाने तीव्र विरोध दर्शवित शासनासह उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या. कराच्या दरवाढीसंदर्भात आंदोलने झाली. याचा परिणाम महापालिकेच्या कर वसुलीवर झाला आहे. ही बाब लक्षात घेता अकोलेकरांना काहीअंशी का होईना दिलासा देण्यासाठी सत्ताधारी भाजपाच्यावतीने चालू आर्थिक वर्षातील कर वसुलीच्या रकमेवर व्याज माफ करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर मांडण्यात आला. काँग्रेस, शिवसेना, भारिप-बमसंच्या नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांचे समाधान न करता भाजपाने घाईघाईत हा प्रस्ताव मंजूर केला. तसेच आजवर ज्या नागरिकांनी व्याजाच्या रकमेचा भरणा केला, त्यांना माफी नसल्याचे महापौरांनी सभागृहात स्पष्ट केले. भाजपाच्या निर्णयामुळे २४ आॅक्टोबरपर्यंत व्याजाची रक्कम जमा करणाºया मालमत्ताधारकांना दिलासा का नाही, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे....तरीही ४१ कोटींची रक्कम थकीतसुधारित करवाढ केल्यामुळे अकोलेकरांमध्ये नाराजीचा सूर असल्याचे पाहून सत्ताधारी भाजपाने चालू आर्थिक वर्षातील कराचा भरणा सोयीस्कर जावा, यासाठी शास्ती अभय योजनेकरिता अकोलेकरांना वारंवार मुदतवाढ दिली. तरीही सद्यस्थितीत अकोलेकरांकडे ९६ कोटींपैकी ४१ कोटींचा कर थकीत असल्याचे चित्र आहे.
हरीशभाई म्हणाले, रक्कम परत करा!चालू आर्थिक वर्षातील कराच्या रकमेवर व्याजाची आकारणी यापुढेही नकोच, अशी भूमिका भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक हरीश आलिमचंदानी यांनी सभागृहात मांडली. तसेच आजवर ज्या नागरिकांनी व्याजाचा भरणा केला, ती रक्कम परत देण्याची मागणी त्यांनी केली, हे विशेष.