अकोला: रादेगो महिला महाविद्यालयातील मुलींचे वसतिगृह आणि बगिच्याची देखभाल करणार्या युवकाचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झालेले भारतीय सेवा सदनचे माजी अध्यक्ष निरंजनकुमार गोयनका आणि माजी सचिव जुगलकिशोर रुंगटा यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती जे.बी. वैराळे यांनी गुरुवारी अंतरिम जामीन मंजूर केला. रोजंदारीवर काम करणार्या पीडित युवकास कायमस्वरूपी नोकरीचे आमिष दाखवून त्याचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून निरंजनकुमार गोयनका आणि जुगलकिशोर रुंगटा यांच्याविरुद्ध ८ जुलै रोजी सिव्हिल लाइन पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. दोन्ही आरोपींनी जामिनासाठी जिल्हा न्यायालयात केलेले अर्ज न्यायालयाने फेटाळून लावले होते. त्यानंतर आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे जामिनासाठी धाव घेतली. गुरुवारी न्यायमूर्ती जे.बी. वैराळे यांच्या न्यायालयात याप्रकरणी सुनावणी झाली. न्यायालयाने दोन्ही आरोपींना आठ दिवसांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला. आरोपींच्या वतीने नागपूरचे अँड. राजेंद्र डागा, अँड. अविनाश गुप्ता आणि अकोल्याचे अँड. मुन्ना खान यांनी बाजू मांडली. *वैद्यकीय तपासणीमध्ये लैंगिक शोषणाचा उल्लेखच नाही पीडित युवकाने लैंगिक शोषणाची चित्रफीत तयार केल्यानंतर, त्याआधारे आरोपींकडून पैसे उकळण्याचा त्याचा उद्देश होता. तो उद्देश साध्य न झाल्याने त्याने पोलिसात तक्रार दिली. पीडित युवकाच्या वैद्यकीय तपासणी अहवालामध्ये त्याचे लैंगिक शोषण झाल्याचा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे त्याचे लैंगिक शोषण झाले की नाही, हे सिद्ध होत नाही, असा युक्तिवाद आरोपींची बाजू मांडताना अँड. राजेंद्र डागा, अँड. अविनाश गुप्ता आणि अँड. मुन्ना खान यांनी केला. या युक्तिवादावरच न्यायालयाने आरोपींना जामीन मंजूर केला.
युवकाचे लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपींना अंतरिम जामीन
By admin | Published: July 24, 2015 12:58 AM