अकोला: महापौर विजय अग्रवाल व भाजप नगरसेवक अजय शर्मा, विजय इंगळे यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाल्याचे महापालिकेच्या आवारात मंगळवारी पाहावयास मिळाले. ऐनवेळेवर भाजपाचे महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, भाजप नगरसेवक बाळ टाले, शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी धाव घेत मध्यस्थी केल्याने प्रकरण निवळण्यास मदत झाली.मागील काही दिवसांपासून नगरसेवक अजय शर्मा यांच्या प्रभाग क्रमांक १२ मधील एका ‘ओपन स्पेस’च्या मुद्यावरून महापौर व दोन्ही नगरसेवकांमध्ये वितुष्ट निर्माण झाल्याची चर्चा आहे. प्रभागातील ओपन स्पेसवर नागरिकांचा अधिकार असल्याने संबंधित व्यावसायिकाने व्यवसाय बंद करून जागा मोकळी करण्यासाठी नगरसेवक अजय शर्मा आग्रही असल्याची माहिती आहे. या विषयावर महापौर अग्रवाल व अजय शर्मा यांच्यात बिनसल्याचे बोलल्या जाते. अखेर मंगळवारी यांच्यातील अंतर्गत कलह उफाळून बाहेर आल्याचे चित्र पाहावयास मिळाले. महापालिकेच्या २०१२ मधील सार्वत्रिक निवडणुकीत मनपात काँग्रेस लोकशाही आघाडीची सत्ता आली. त्यावेळी महापौरपदी भारिप-बमसंच्या ज्योत्स्ना गवई विराजमान झाल्या होत्या. विद्यमान महापौर विजय अग्रवाल यांचे भाजपमध्ये बिनसल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली आणि त्यात विजयी झाले होते. यादरम्यान, त्यांनी लोकशाही आघाडीच्यावतीने मनपाच्या स्थायी समितीचे सभापतीपद भूषविले. त्यानंतर २०१४ मध्ये विजय अग्रवाल यांनी भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केला. तेव्हापासून महापौर विजय अग्रवाल, भाजप नगरसेवक विजय इंगळे, अजय शर्मा यांच्यातून विस्तवही जात नसल्याचे बोलल्या जाते. ही बाब पक्षश्रेष्ठींना अवगत असून, महापालिकेत सत्ता मिळाल्यानंतर वाद वाढणार नाहीत, याबद्दल संबंधितांना सूचना करण्यात आल्या होत्या, हे विशेष.मनपा आवारात बाचाबाचीमहापौर विजय अग्रवाल व नगरसेवक विजय इंगळे, अजय शर्मा यांच्यात मंगळवारी सायंकाळी मनपाच्या आवारात चांगलीच बाचाबाची झाली. त्यावेळी ऐनवेळेवर धाव घेत भाजपाचे महानगराध्यक्ष किशोर पाटील यांच्यासह भाजप-सेनेच्या नगरसेवकांनी मध्यस्थी केल्याचे दिसून आले.