- अतुल जयस्वाल
अकोला : डोंगरापासून पठारापर्यंत, घनदाट जंगलांपासून ओसाड माळरानापर्यंत अशी भौगोलिक स्थिती लाभलेल्या अकोला जिल्ह्यात जैवविविधताही मोठी आहे. जैवविविधतेचा हा समृद्ध वारसा पुढील पिढ्यांना माहिती व्हावा, यासाठी शहरातील जागरूक निसर्गप्रेमींनी 'अकोला ऑल टॅक्सा बायोडायव्हर्सिटी इन्व्हेंटरी' (एएटीबीआय) या उपक्रमांतर्गत जैवविविधतेची शास्त्रोक्त माहिती संकलित करण्याचे कार्य हाती घेतले आहे. गत सहा महिन्यांत ६००० च्या वर प्रजातींची नोंद करण्यात आली आहे.
विविध प्रकारच्या कीटकांपासून ते अन्नसाखळीतील सर्वोच्च घटक असलेल्या वाघापर्यंतच्या प्राण्यांचा जिल्ह्यात अधिवास आहे. कित्येक प्रकारचे पक्षी, फुलपाखरे, सस्तन प्राणी, कीटक अशा विविध प्रकारची जैवविविधता अकोल्यात आहे. तथापि, जिल्ह्यातील विपुल जैवविविधतेची नोंद मात्र कुठेही नाही. यामुळे भावी पिढी या माहितीपासून वंचित राहू नये म्हणून काही निसर्गप्रेमींनी जैवविविधतेची माहिती संकलित करण्याचा ध्यास घेतला आहे. शास्त्रज्ञ आणि निसर्गप्रेमी यांना बरोबर घेऊनच हे कार्य सिद्ध होऊ शकते. यासाठी सहा महिन्यांपूर्वी पर्यावरण आणि वने शिक्षण केंद्र (ईएफईसी) एएटीबीआय हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, या उपक्रमात अनेक महाविद्यालये आणि संस्थांनी आपली नोंदणी केली आहे. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत ६००० विविध प्रजातींची नोंद करण्यात आली असून, तज्ज्ञांकडून त्याची पडताळणी केली जात आहे. या उपक्रमासाठी एक सुकाणू समिती असून, त्यामध्ये डॉ. अर्चना सावरकर, देवेंद्र तेलकर, हरीश मालपाणी, हर्षवर्धन देशमुख, डॉ. नितीन ओक, डॉ. रश्मी जोशी-सावलकर, डॉ. सहदेव रोठे, उदय वझे, डॉ. विजय नानोटी, डॉ. ययाती तायडे, योगेश देशमुख यांचा समावेश आहे.
१०० वर नव्या प्रजाती
एएटीबीआयकडे आतापर्यंत सहा हजारांवर प्रजातींची नोंद झाली आहे. याव्यतिरिक्त १०० प्रजाती अशा आहेत, ज्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. अर्थात, त्या नव्या प्रजाती आहेत. तज्ज्ञांकडून त्यांची पडताळणी केल्यानंतर या प्रजातींची नोंद होणार आहे.
६० हजार नोंदीची अपेक्षा
जिल्ह्यात शेकडो प्रकारचे कीटक, पक्षी, प्राणी आढळतात. त्यामुळे या उपक्रमात सजीवांच्या ६०,००० ते ८०,००० नोंदी होण्याची अपेक्षा आहे. यासाठी वर्ष २०२४ पर्यंत ही माहिती संकलित केली जाणार आहे.
एएटीबीआय प्राप्त होणाऱ्या माहितीची तज्ज्ञांकडून पूर्णपणे पडताळणी केल्यानंतर नोंद केली जात आहे. आतापर्यंत ६ हजारांवर प्रजातींची नोंद करण्यात आली आहे.
- उदय वझे, जैवविविधता अभ्यासक, अकोला
पुढील पिढीला जिल्ह्यातील जैवविविधतेची माहिती उपलब्ध व्हावी यासाठी हा उपक्रम सुुरू केला आहे. शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांकडून जैवविविधतेची माहिती संकलित केली जात आहे.
- डॉ. अर्चना सावरकर, जैवविविधता अभ्यासक, अकोला