अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात कोविड वार्डात सेवा देणाऱ्या आंतरवासीता डॉक्टरांना आता दहा हजार रुपये जादा मानधन मिळणार आहे. या डॉक्टरांना त्यांच्या नियमिती मानधनासोबतच अतिरिक्त दहा हजार रुपये मानधन देण्यास पालकमंत्री बच्चू कडू यांनी मान्यता दिली आहे.सर्वोपचार रुग्णालयातील आंतरवासिता डॉक्टरांनी कोविड वार्डात काम केल्याबद्दल नियमित मानधना व्यतिरिक्त विशेष मानधन मिळावे, अशी मागणी केली होती. आपल्या मागणीसाठी तब्बल १२० आंतरवासीता डॉक्टरांनी सेवा बंद केली होती. त्यामुळे आरोग्य यंत्रणा विस्कळीत होण्याची शक्यता लक्षात घेता. या डॉक्टरांना तातडीने कामावर येण्याच्या सूचना वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने दिल्या होत्या. जीव धोक्यात घालून सेवा देणाºया आंतरवासीता डॉक्टरांच्या या मागणीबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मंगळवारच्या बैठकीत पालकमंत्री बच्चू कडू यांच्याकडे मुद्दा मांडला. त्यावेळी कडू यांनी, मागणी करण्यात आलेल्या १९ हजार रुपयांपैकी दहा हजार रुपये मानधन देण्यास मान्यता दिली. तसेच उर्वरित रकमेसंदर्भात राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी झालेल्या चर्चेत डॉ.कुसुमाकर घोरपडे, डॉ.दिनेश नेताम, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आदी उपस्थित होते.