अकोला : शहरातील सिविल लाइन्स, खदान व रामदासपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फ्लॅटमध्ये भरदिवसा घरफोडी करून मोबाईल लॅपटॉप व रोख रक्कम पळविणाऱ्या तामिळनाडूतील अटल चोरट्यांच्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी बेड्या ठोकल्या. या दोन चोरट्यांकडून नऊ मोबाईल, एक लॅपटॉप जप्त करण्यात आला असून दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुधीर कॉलनीतीळ वैष्णवी अपार्टमेंट येथील तीन फ्लॅटमध्ये चोरी करण्यात आली होती. या तीन फ्लॅट मधून तब्बल पाच मोबाईल व रोकड पळविण्यात आली होती. याप्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. त्यानंतर रामनगर येथील मधू प्रभा रेसिडेन्सी येथेही चोरी करण्यात आली होती. या दोन चोऱ्यानतर खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खडकी येथील अपार्टमेंटमध्ये भरदिवसा चोरी करून दोन मोबाईल व लॅपटॉप पळविण्यात आला होता. या दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीचा तपास होत नाही तेच रामदासपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ताहीर अपार्टमेंट येथे भर दिवसा घरफोडी करून मोबाइल व रोख रक्कम पळवण्यात आली होती. या तीनही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोऱ्या एकाच टोळीने केल्याचे पोलीस तपासात समोर आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने या चोरट्यांचा शोध सुरू केला. दरम्यान तामिळनाडूतील ही चोरट्यांची टोळी असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी तांत्रिक दृष्ट्या तपास करून या मधील सिरानजीवी नारायणन 28 वेलूरे तामिळनाडू व कुप्पन कांगान, राहणार वेलूरे तामिळनाडू या दोन चोरट्यांना अटक केली. या दोन चोरट्यांकडून ९ मोबाइल एक लॅपटॉप, रोख रक्कम असा एकूण दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक श्री श्रीधर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलिस उपअधीक्षक सचिन कदम, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सागर हटवार, नरेंद्र पद्मने, दशरथ बोरकर, नितीन ठाकरे ल, सदाशिव सुडकर, मोहम्मद रफिक, अब्दुल माजिद, एजाज अहमद, रवी इरचे, शंकर डाबेराव, मोहम्मद नफिस, स्वप्नील खेडकर, अनील राठोड, विजय कपले, रवी पालीवाल, सुशील खंडारे, रोशन पटले व सायबर सेलचे गणेश सोनोने यांनी केली.