- विजय शिंदेअकोट (जि. अकोला): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणा राज्यात निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस व सोनिया गांधी यांच्यावर केलेली टीका ही केवळ राजकिय नैराश्यातून असून, एखाद्या महिलेबद्दल असे उद्गार काढणे, राजकारणात न शोभणारी बाब आहे. ही टीका म्हणजे त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे लक्षण आहे, असे मत महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीचे अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.जनसंघर्ष यात्रा दरम्यान अकोट (जि.अकोला) येथे आलेल्या अशोक चव्हाण यांची ‘लोकमत’ने विशेष मुलाखत घेतली.नरेंद्र मोदी यांनी सोनिया गांधींना उद्देशून केलेल्या विधानाचा निषेध करीत अशोक चव्हाण यांनी हा प्रकार म्हणजे निश्चितच महिलांचा अपमान असल्याचे सांगितले. पंतप्रधान मोदी यांचे वाटेल त्या धमक्या देणे, सोनिया गांधी, राहुल गांधी बद्दल वक्तव्य करणे, धाड घालणे, कारवाई करणे, हे राजकिय नैराश्यातून होत आहे.राज्यातील आगामी निवडणूकीच्या आघाडीबाबत बोलताना भारिप-बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा यांना महाआघाडीत घेण्यास काँग्रेस तयार असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले. महाआघाडीत एमआयएम हाच खरा अडचणीचा विषय आहे. त्यातून काय मार्ग काढता येईल , तो चर्चेतून काढू. विषय अजून संपलेला नाही. बोलणी सुरु आहे, असेही अशोक चव्हाण यांनी सांगितले.पाच राज्यांतील निवडणुकीनंतर ‘एक्झिट पोल’चा कौल काँग्रेसच्या दिशेने असल्याच्या पृष्ठभूमीवर महाराष्ट्रात आघाडी केल्यानंतर जागा वाटणे हे महत्वाचे नसून जागा निवडून येणे हे महत्वाचे असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. जागावाटपात उमेदवाराची निवडून येण्याची क्षमता पाहणे महत्वाचे असल्याचेही अशोक चव्हाण यांनी सांगितले.