विधानसभेच्या उमेदवारीसाठी उद्या कॉँग्रेसच्या मुलाखती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 01:58 PM2019-07-29T13:58:18+5:302019-07-29T13:58:25+5:30
अकोला शहर आणि जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीने जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांतील इच्छुक उमेदवारांच्या मंगळवारी मुलाखती आयोजित केल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : विधानसभा निवडणुकीत भाजप-सेनेला टक्कर देण्याचा संकल्प काँग्रेसने केला आहे. त्यामुळे तिकीट वाटपाची प्रक्रिया लवकर व्हावी, या उद्देशाने अकोला शहर आणि जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीने जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांतील इच्छुक उमेदवारांच्या मंगळवारी मुलाखती आयोजित केल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती स्वराज्य भवन येथे होत आहेत. पाचही मतदारसंघांसाठी तब्बल ५३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या मुलाखतीला प्रदेश काँग्रेसकडून बुलडाणा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार राहुल बोंद्रे तसेच राहुल ठाकरे यांना निरीक्षक नियुक्त केले असून, यावेळी त्याच्यासमवेत जिल्हा निवड मंडळाचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित राहतील. या मुलाखती दरम्यान उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करू नये, असे आवाहन जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, महानगराध्यक्ष बबनराव चौधरी व कार्याध्यक्ष सुनील धाबेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे.
मित्रपक्षांसाठी सोडलेल्या मतदारसंघातही दावेदारी
विधानसभेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी असली तरी काँग्रेसकडून अकोला जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांसाठी अर्ज आले आहेत. मूर्तिजापूर हा मतदारसंघ राष्टÑवादी काँग्रेसला आतापर्यंत आघाडीमध्ये देण्यात आला आहे. तेथे तब्बल सहा उमेदवारांनी दावा दाखल केला आहे.
अकोला पश्चिमसाठी सर्वाधिक इच्छुक
अकोला पश्चिम या मतदारसंघावर राष्टÑवादी काँग्रेसने दावेदारी सांगितली असली, तरी या मतदारसंघासाठी काँग्रेसमधून सर्वाधिक इच्छुक असल्याचे समोर आले आहे. तब्बल १६ इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले असल्याने या मतदारसंघावरून आघाडी धर्म अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे अकोला पूर्व मतदारसंघासाठी केवळ तीन उमेदवारांचे अर्ज आले आहेत.
राज्य निवड मंडळाची ६ आॅगस्टला बैठक
जिल्हा स्तरावरील मुलाखती आटोपल्यानंतर मुंबईत टिळक भवन येथे राज्य निवड मंडळाची ६ ते ७ आॅगस्ट दरम्यान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेत बैठक होईल. यात जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांची नावे निश्चित करण्यात येतील. या बैठकीला शहर आणि जिल्हा कॉँग्रेसचे अध्यक्ष, प्रदेश कॉँग्रेसचे निरीक्षक आणि जिल्हा प्रभारी उपस्थित राहतील.
अमानकर यांनी मागितली अकोटमधून उमेदवारी!
उपजिल्हाधिकारी पदावरून सेवानिवृत्त झालेले अशोक अमानकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला असून, अकोट मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसकडे उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला आहे. अकोटमध्ये तब्बल ११ उमेदवार स्पर्धेत आहेत.