अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानासमोर अनुचित प्रकार घडू शकतो, असे पत्र गुप्तचर यंत्रणांनी सह पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील (कायदा व सुव्यवस्था) यांना घटनेच्या चार दिवस आधी म्हणजेच ४ एप्रिल रोजी दिले होते. यासंदर्भात योग्य कार्यवाही करणे गरजेचे असतानाही विश्वास नागरे पाटील यांनी तसे केली नाही. ज्यांनी दुर्लक्ष केले त्यांनाच या घटनेच्या चौकशीसाठी गठीत करण्यात आलेल्या समितीचे प्रमुख करणे आक्षेपार्ह असून, त्यांना तातडीने या पदावरून हटवून त्यांचीच चौकशी करावी व माहिती दडवून ठेवली म्हणून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी (१३ एप्रिल)येथे केली.
येथे आयोजित पत्रकार परिषदेत ॲड. आंबेडकर म्हणाले, की केवळ सिल्वर ओकच नव्हे, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मातोश्री बंगला तसेच वर्षा हे शासकीय निवासस्थान, आझाद मैदान, मंत्रालय, सह्याद्री अतिथीगृह परिवहन मंत्री अनिल परब यांचे शासकीय निवासस्थान व वांद्रे येथील खासगी निवासस्थान या ठिकाणी एसटी कर्मचारी आंदोलन करू शकतात, असे आशयाचे पत्र विशेष शाखेचे अपल पोलीस आयुक्त निशिथ मिश्रा यांनी सह पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांना ४ एप्रिल रोजी पाठविले होते. त्यामुळे सिल्वर ओकसहीत सर्वच ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ का करण्यात आली नव्हती, असा सवाल उपस्थित होतो. राज्याचे पोलीस प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दररोज सकाळ व संध्याकाळी गुप्तचर अहवाल देत असतात. त्यामुळे सदर घटनेचा अहवाल गुप्तचर खात्याने त्यांना दिला की नाही याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे, असे ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.
गुप्तचर खात्याद्वारे माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात नेमक्या काय सुचना दिल्या होत्या, हे जनतेसमोर येणे गरजेचे आहे, असेही ॲड. आंबेडकर म्हणाले. पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे धैर्यवर्धन पुंडकर, प्रदीप वानखडे, राजेंद्र पातोडे, बालमुकुंद भिरड, प्रमोद देंडवे आदी उपस्थित होते.