मूर्तिजापूर : तालुक्यातील माना येथे बांधण्यात आलेले सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम निकृष्ट असून, या बांधकामाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारीतून करण्यात आली. यासंदर्भातील संतोष गोपीचंद कोकणे व सागर सुनील नाईक यांनी लेखी निवेदन सादर केले.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार, माना येथील सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असून, त्याची तक्रार संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आली. याबाबत चौकशीही करण्यात आली. परंतु ज्यादिवशी चौकशी करण्यात आली त्यावेळी अधिकारी गैरहजर होते. त्यावेळी केवळ माना ग्रामपंचायतीचे सचिव, दोन सदस्य उपस्थित होते. चौकशी समाधानकारक केली नसल्याने पुन्हा समिती नेमून त्या सार्वजनिक शौचालय बांधकामाची निष्पक्षपातीपणे चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
----------------------------
....अन्यथा बेमुदत उपोषण
माना येथील शौचालयाच्या बांधकामाची पुन्हा समिती नेमून फेरचौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.