लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात येणाऱ्या वाघळूद ग्रामपंचायतीचे सरपंच, सचिव, रोजगार सेवक, ९ बँकांचे व्यवस्थापक आणि काही अन्य कर्मचाऱ्यांच्या संगणमतातून झालेल्या रोजगार हमी योजनेतील घोटाळ्याची चौकशी सद्या सुरू आहे. यादरम्यान १९ ते २१ सप्टेंबर या कालावधीत ९२ संशयित जॉबकार्डधारकांची कसून चौकशी केली जात आहे. सोमवार, २३ सप्टेंबरपासून कर्मचाºयांनाही चौकशीसाठी बोलाविले जाणार असल्याची माहिती रोहयोचे नायब तहसीलदार घनश्याम डाहोरे यांनी दिली.वाघळूदचे सरपंच कृष्णा देशमुख यांच्यासह सचिव, रोजगार सेवक आणि मालेगाव पंचायत समितीचे तत्कालिन गटविकास अधिकाºयांसह अन्य काही कर्मचाºयांनी वाघळूद, मुठ्ठा आणि वाकद येथे झालेल्या रोजगार हमी योजनेच्या विविध कामांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार गावातीलच काही सुज्ञ नागरिकांनी जिल्हा प्रशासनाकडे केली. दरम्यान, ‘लोकमत’ने देखील याप्रकरणी विविधांगी वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रशासनाने समिती नेमून चौकशीस सुरूवात केली. गत दीड महिन्यापासून सुरू असलेल्या या चौकशीदरम्यान वेगवेगळ्या स्वरूपातील गैरव्यवहार समोर येत आहेत. त्यानुसार, काही दिवसांपूर्वी ९ बँकांमधील १२४ बँक खाते सील करण्याची धडक कारवाई प्रशासनाने केली. तसेच १९ सप्टेंबरपासून संशयित ९२ जॉबकार्डधारकांना नोटीस देऊन चौकशीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलाविण्यात येत आहे. ही प्रक्रिया २१ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. त्यानंतर २३ सप्टेंबरपासून रोहयो घोटाळ्यात सहभाग निश्चित झालेल्या कर्मचाºयांनाही चौकशीसाठी बोलाविण्यात येणार असून संबंधितांना तशा नोटीस देखील देण्यात आल्या आहेत, अशी माहिती नायब तहसीलदार डाहोरे यांनी दिली.(प्रतिनिधी)
९२ संशयित जॉबकार्डधारकांची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 3:37 PM