लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गेल्यावर्षी प्राप्त साहित्य लाभार्थींंना परस्पर वाटप केल्याची चौकशी करण्यासोबतच अकोट तालुक्यात विशेष घटक योजनेचा लाभ एकाच कुटुंबातील चौघांना दिल्याप्रकरणीही फौजदारी कारवाई करण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे पत्रातून केली जाणार आहे. या दोन्ही मुद्यांवर जिल्हा परिषद कृषी समितीच्या सभेत शुक्रवारी चर्चा झाली.सभापती माधुरी विठ्ठलराव गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत सदस्य रमण जैन, शोभा शेळके, हिंमतराव घाटोळ, चंद्रशेखर पांडे गुरुजी, विलास इंगळे, शबाना खातून सैफुल्लाखा यांच्यासह कृषी विकास अधिकारी एच.जी. ममदे उपस्थित होते. कृषी विभागाच्या गेल्या वर्षीच्या योजनांचे साहित्य पंचायत समिती स्तरावर पडून आहे. ते त्याच तालुक्यातील लाभार्थींंना वाटप करावे, सर्वच तालुक्यांत शिल्लक असलेले साहित्य अवैधपणे लाभार्थींंना परस्पर वाटप केल्याचा प्रकार घडला आहे. त्यामध्ये सबर्मसिबल पंप, कडबा कटर, पाइप, ग्राइंडर कम पल्वरायजर, मनुष्यचलित पेरणीयंत्रांचा समावेश आहे. गेल्या काळात तीन कोटी ७५ लाख रुपये खर्चातून योजनांचे साहित्य प्राप्त झाले; मात्र त्याचे लाभार्थी कृषी विभागाने परस्पर ठरविले, असे रमण जैन यांनी म्हटले. विशेष घटक योजनेतून बैलगाडी, बैलजोडीचा लाभ देण्यासाठी अकोट तालुक्यात एकाच कुटुंबातील चौघांची निवड झाली, हा गंभीर प्रकार आहे. त्याची चौकशी करून संबंधित अधिकार्यांवर फौजदारी कारवाई करण्याच्या चर्चेसोबतच मुख्य कार्यकारी अधिकार्यांना पत्र देण्याचे सभापती गावंडे यांनी सांगितले. जिल्हय़ातील ग्रामपंचायतींमध्ये अपारंपरिक ऊर्जा विभागाकडून ५0 लाखांच्या खर्चातून सौरदिवे दिले जाणार आहेत, त्यासाठी प्रस्ताव मागवण्याचे ठरले.
तीन कोटी ७५ लाखांच्या साहित्य वाटपाची चौकशी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2017 5:53 AM