लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: बुलडाणा जिल्हय़ात धान्याचा काळाबाजार झाल्याप्रकरणी आसिफ खान यांची मेहकर पोलिसांनी चौकशी केल्यानंतर पुरवठा अधिकार्यांनी वाडेगाव येथील स्वस्त धान्य दुकानदार तसेच माजी सरपंच आसिफ खान यांच्या दुकानातील धान्याची चौकशी केली. या चौकशीनंतर बाळापूर तहसीलदार यांनी अहवाल तयार केला आहे. काळाबाजारात जाणारा गव्हाचा ट्रक मेहकर पोलीस व तहसीलदारांनी गत काही दिवसांपूर्वी पकडला होता. या ट्रकमधील गहू हा काळाबाजारात जात असल्याची खात्री होताच मेहकर पोलिसांनी ट्रकचालकासह बुलडाणा जिल्हय़ातील दोघांविरुद्ध व वाशिम येथील एका धान्य माफियाविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियमानुसार गुन्हे दाखल केले होते. या आरोपींची पोलिसांनी सखोल चौकशी केली असता वाडेगाव येथील माजी सरपंच आसिफ खान यांच्याशी त्यांचा संपर्क आल्याचे समोर आले होते.:त्यामुळे आसिफ खान यांची मेहकर पोलिसांनी चौकशी केली होती. या सर्व प्रकारामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे यांनी बाळापूर तहसीलदार दीपक पुंडे यांना आसिफ खान यांच्या वाडेगाव येथील दुकानाची तपासणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार निरीक्षण अधिकार्यांनी खान यांच्या दुकानाची चौकशी केली व तसा अहवाल तहसीलदारांकडे पाठविला; मात्र अद्याप हा अहवाल तहसीलदार यांच्याकडे आला नसल्याची माहिती आहे.
पोलिसांकडूनही दुर्लक्ष रेशन व शालेय पोषणच्या धान्याचा मोठय़ा प्रमाणात काळाबाजार सुरू असून, याकडे अकोला पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याचा आरोप होत आहे. मेहकर पोलिसांनी पातूर तालुक्यामधून माहिती मिळाल्यानंतर या गव्हाचा ट्रक पकडला होता; मात्र अकोला पोलिसांना काळाबाजार करणार्या माफियांवर मेहेरनजर ठेवल्याचे दिसून येते. अकोल्यात मोठय़ा प्रमाणात हा घोटाळा सुरू असताना याकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे.अमरावती येथील एका मोठय़ा कंत्राटदाराकडून धान्याचा काळाबाजार करण्यात येत आहे. यामध्ये अनेक बड्या व्यक्तींचे हात असल्याने महसूल प्रशासन मूग गिळून बसले आहे. चिमुकल्या मुलांचा व गरिबांचा घास हिसकणार्या या मोठय़ा कंत्राटदारावर पोलिसांनी कारवाईचा फास आवळण्याची आवश्यकता असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणात पुरवठा विभागातील सेवानवृत्त कर्मचार्यांसह अनेकांचे हात ओले असून, पोलिसांनी सखोल तपास केल्यास बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.