लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रम ग्रामीण अंतर्गत जिल्ह्यातील २५ गावांची तपासणी करण्यासाठी केंद्र शासनाच्या पथकाकडून ३ ते ५ सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यातील गावात भेटी दिल्या जाणार आहेत. गावातील स्वच्छतेची पाहणी करून त्याबाबतचे सर्वेक्षण पथकाद्वारे केले जाणार आहे.स्वच्छ सर्वेक्षणादरम्यान गावातील सार्वजनिक स्थळे, शासकीय इमारती, त्यामध्ये अंगणवाडी, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशू चिकित्सालय, ग्रामपंचायत कार्यालय, सर्व धार्मिक प्रार्थना स्थळे, बाजाराची ठिकाणे, समाजमंदिर, चावडी, बसस्थानक, गावातील चौकाची पाहणी केली जाणार आहे. सोबतच गावातील सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापनाच्या कामाचेही गुणांकन केले जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणी स्वच्छता ठेवण्यासाठी श्रमदान मोहीम राबविण्यात यावी, गाव स्वच्छ करावे, शक्य तेथे शोषखड्ड्यांचे खोदकाम करावे, परसबाग तयार करावी, असे निर्देश गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले. प्रत्येक विस्तार अधिकाºयावर ती जबाबदारी देण्याचे पत्रात म्हटले आहे.या तपासणीदरम्यान ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, पाणी पुरवठा कर्मचारी, पोलीस पाटील, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष, गावातील प्रभावी व्यक्ती, महिला, जलसुरक्षक, आशा, अंगणवाडी सेविका, मुख्याध्यापक, शिक्षक, गाव स्तरावरील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचेही पाणी पुरवठा व स्वच्छता कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजीव फडके यांनी पत्रात म्हटले आहे.
ग्रामपंचायतमध्ये स्वच्छ सर्वेक्षणासाठी तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2019 1:35 PM