अकोला : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या अभिलेख्यांची तपासणी करण्यासाठी गठित केलेल्या जिल्हा परिषदेच्या दोन अधिकाऱ्यांच्या पथकाने पातूर पंचायत समितीमधील ग्रामपंचायतींची तपासणी केली.पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजीव फडके, गटविकास अधिकारी विनोद शिंदे, विस्तार अधिकारी अनंत लव्हाळे, समाजशास्त्रज्ञ शाहू भगत, समूह समन्वयक राहुल अरखराव यांच्यासह ग्रामसेवक यावेळी उपस्थित होते.ग्रामपंचायतींच्या स्वतंत्र, प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची पाणीपट्टी वसुली, भारत निर्माण, महाजल, राष्ट्रीय पेयजल योजनेच्या प्रलंबित कामांचा आढावा तसेच २००२ ते २०१८ पर्यंत दलित वस्ती विकास योजनेतील अपूर्ण कामांचा आढावा पथकांकडून घेतला जात आहे. त्यासाठी पंचायत समितीनिहाय वेळापत्रक देण्यात आले. त्यानुसार पातूर पंचायत समितीची २७ डिसेंबर रोजी तपासणी करण्यात आली. त्यानंतर आता बार्शीटाकळी पंचायत समिती ३० डिसेंबर, अकोट-३१, तेल्हारा-२ जानेवारी, मूर्तिजापूर-४ जानेवारी, अकोला-७ जानेवारी रोजी तपासणी केली जाणार आहे.पातूर पंचायत समिती अंतर्गत ५७ पैकी ५४ ग्रामपंचायतीचा शाश्वत स्वच्छता आराखडा तयार करण्यात आला. उर्वरित ३ ग्रामपंचायतींचा आराखडा तयार करणे सुरू आहे. २६ ग्रामपंचायतीमध्ये ओडीएफ टप्पा दोनची पडताळणी सुरू आहे. ३१ ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकाना ३१ डिसेंबरपूर्वी ते पूर्ण करण्याचे बजावण्यात आले. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता उत्कृष्ट प्रभाग अहवाल तयार आहे. रासायनिक पाणी तपासणी मोहिमेत ८७ टक्के काम झाले. जमाखर्च, उपयोगिता प्रमाणपत्र तयार ठेवणे, वैयक्तिक शौचालय बांधकाम १०० टक्के पूर्ण झाले आहे. हगणदरीमुक्त गावाचे बोर्ड लावण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.