अकोला : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडक शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र उभारणीसाठी साहित्याचा पुरवठा करून केंद्राची निर्मिती करण्याचे काम पुरवठादाराला देण्यात आले. त्याची पडताळणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या विविध पथकांना जबाबदारी देण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्यावतीने राज्यातील काही शाळांची निवड नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रासाठी करण्यात आली. त्या शाळांमध्ये साहित्य आणि केंद्र उभारणी करून देण्यासाठी निविदा प्रक्रियेतून पुरवठादाराची निवड करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील निवडक शाळांमध्ये विज्ञान केंद्र उभारणीचे काम सुरू आहे. त्या शाळांमध्ये प्राप्त साहित्य आणि केंद्र उभारणीच्या कामाची पाहणी करण्याची जबाबदारी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांवर आहे. त्यानुसार अकोला जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्राप्त साहित्याची तपासणी केली जात आहे. त्या तपासणी पथकामध्ये जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी व महापालिकेचे शिक्षणाधिकारी यांचा समावेश आहे. प्रत्येक तालुक्यातील केंद्रांच्या संख्येनुसार नियोजन करण्यात आले आहे. त्याची जबाबदारी पथकांकडे देण्यात आली आहे.