सचिन राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शासनाच्या मालकीचा तब्बल २0 कोटी रुपयांचा भूखंड भूमी अभिलेख विभागातील संगणकात ऑनलाइन नोंद घेऊन कागदोपत्री हडपण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी हे आदेश सोमवारी दिले आहेत. अकोला शहरातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/१ व शिट नं. ३७ बी १२१/१ अ हे संतोषी माता मंदिरानजीकचे भूखंड शासनाच्या नावे आहेत. या भूखंडातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/ ‘पैकी’ असा शब्दप्रयोग करून तब्बल २0 कोटी रुपये किमतीच्या ३ हजार ७१७.१७ चौरस मीटर भूखंडाचे हस्तलिखित दस्तावेज नसताना तालुका भूमी अभिलेख विभागातील अधिकारी आणि कर्मचार्यांच्या संगनमताने गजराज गुदडमल मारवाडी यांच्या नावे संगणकात ऑनलाइन नोंद घेऊन हा भूखंड कागदोपत्री हडपण्यात आला आहे. हे प्रकरण ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणले तसेच पाठपुरावा केला. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यातही तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्या आदेशानंतर भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक बी. डी. काळे यांनी तीन कर्मचार्यांना निलंबित केले. एका कर्मचार्याची विभागीय चौकशी सुरू केली आहे, अशातच आता गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी दिले असून, तपासही आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे.
ठाणेदार जुमळेंनी केली कुंडली गोळाभूखंड घोटाळय़ाची तक्रार झाल्यानंतर सिटी कोतवालीचे ठाणेदार अनिल जुमळे यांनी योग्यरीत्या तपास करीत यामध्ये सहभागी असलेल्या अनेकांची कुंडली गोळा केली आहे. त्यामुळे सदर प्रकरणात दोषी असलेल्या भूमाफियांसह या विभागातील अधिकारी व कर्मचार्यांवर फौजदारी कारवाई होणार आहे. सदर प्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख गणेश अणे करणार असल्याची माहिती आहे.
भूखंड घोटाळय़ात सहभागी असलेल्या अधिकारी व कर्मचार्यांवर लवकरच गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. तसेच कर्मचारी व अधिकारी दोषी असून, भूखंड बळकावणारा माफिया मुख्य आरोपी आहे. त्यामुळे या सर्वांवर तातडीने कारवाई करण्यासाठी हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे.- एम. राकेश कलासागर, पोलीस अधीक्षक