अकोला, दि. २- उल्हासनगर येथील एका फायनान्स कंपनीचे कार्यालय फोडून चोरट्यांनी ३२ किलो सोने लुटून नेल्याची घटना २७ डिसेंबर रोजी घडली होती. या पृष्ठभूमिवर शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांनी शहरातील सोने तारण ठेवणार्या बँका, पतसंस्थांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलिसांकडून विशेषत: सोने तारण ठेवणार्या बँका, पतसंस्थांची तपासणी करून तेथील सुरक्षेचा आढावा घेण्यात येत आहे. नोटबंदीच्या निर्णयामुळे चोरटे, दरोडेखोरांनी त्यांचा मोर्चा सोन्याच्या दागिन्यांकडे वळविला आहे. सोने तारण ठेवणार्या बँका, पतसंस्थांना त्यांनी आपले लक्ष्य बनविण्याचा प्रयत्न केला आहे. २७ डिसेंबर रोजी उल्हासनगर येथील एका फायनान्स कंपनीच्या कार्यालयातील भिंत फोडून चोरट्यांनी ३२ किलो सोने लंपास केल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली. अकोल्यातही पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांनीही पोलिसांना खबरदारी बाळगण्याचे आणि शहरातील सोने तारण ठेवणार्या बँका, पतसंस्थांची तपासणी करून, त्यांनी सोने सुरक्षिततेसाठी काय उपाययोजना केल्या आहेत, सुरक्षेची व्यवस्था केलेली आहे किंवा नाही, यासंदर्भात आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शहरातील सातही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत येणार्या बँक, पतसंस्थांची पोलिसांनी तपासणी केली आणि तेथील सुरक्षेचा आढावा घेतला. यासोबतच कोणत्या बँकेत, पतसंस्थेत किती किलो ग्रॅम सोने तारण ठेवलेले आहे, याची माहितीसुद्धा पोलिसांनी जाणून घेतली. गत आठवडाभरापासून शहरात ही तपासणी मोहीम राबवून आढावा घेण्यात येत आहे. तपासणीदरम्यान सोने तारण ठेवणार्या काही बँका व पतसंस्थांनी कोणत्याच उपाययोजना केल्या नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे, त्यामुळे या बँका व पतसंस्थांच्या अधिकार्यांना सोन्याच्या दागिन्यांची सुरक्षा करण्यासाठी योग्य ती यंत्रणा उभारण्यासंबंधी सूचना देण्यात आल्या आहेत.
सोने तारण ठेवणार्या बँका, पतसंस्थांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2017 1:25 AM