अकोला : इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल)च्या ११ व्या सीझनमध्ये शनिवारी चेन्नई सुपर किंग्स आणि किंग्स एलेव्हन पंजाब यांच्यात सुरू असलेल्या क्रिकेट मॅचवर मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या सनसिटीतील सट्टा अड्ड्यावर दहशतवाद विरोधी कक्षाने छापा टाकला. या ठिकाणावरून राज्यातील सर्वात मोठा सट्टा किंग सुधीर सावंतसह पाच जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून मोबाइल, लॅपटॉपसह लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मलकापूर रोडवर असलेल्या सनसिटीमधील एका आलिशान बंगल्यात ‘आयपीएल’च्या सामन्यांवर मोठ्या प्रमाणात सट्टा खेळण्यात येत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी कक्षाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांना मिळाली. त्यांनी पथकासह छापा टाकून या ठिकाणावरून सुधीर क्रिष्णा सावंत रा. रामदासपेठ, श्याम हेडा रा. रामनगर, प्रवीण नारायण अहीर, कौस्तुभ संजय ठाकरे व विनोदकुमार सनसिंहकुमार या पाच जणांना रंगेहात अटक केली. सनसिटीतील या बंगल्याच्या दरवाजांना बाहेरून कुलुप लावून आतमध्ये सट्ट्याचा बाजार सुरू होता. दिल्लीतून आणलेली एक खास मशीन, ५४ मोबाइल, चार लॅपटॉप, दोन टीव्ही, सेटअप बॉक्ससह लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोनशेच्यावर जणांकडे अॅपआयपीएलच्या सामन्यांवर सट्टा लावण्यासाठी एक विशेष अॅप तयार करण्यात आले असून, सुधीर सावंत आणि श्याम हेडा या दोघांनी हे अॅप जिल्ह्यातील तब्बल दोनशेच्यावर मोबाइलमध्ये डाउनलोड करून दिले. या अॅपच्या माध्यमातून सट्ट्याची देवाण-घेवाण करण्यात येत असून, अॅपचा पासवर्डही श्याम हेडाकडेच असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर जाळेसुधीर सावंत याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर जाळे असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. मूळचा सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या सावंतचे अकोल्यातील कामकाज श्याम हेडा पाहतो. त्याच्या रकमेची देवाण-घेवाण आणि आयपीएलवरील सट्ट्याची माहिती घेण्यासाठीच तो आलिशान कारने अकोल्यात आल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. दिल्लीतून आणलेली खास मशीन जप्तसट्टा खेळण्यासाठी एक खास मशीन दिल्लीतून आणण्यात आली आहे. या मशीनद्वारे जिल्ह्यातील दोनशेच्यावर मोबाइल अटॅच करण्यात आले असून, त्याद्वारे मध्यस्थी करणारे आणि मुख्य सट्टा खेळणारे यांच्यात समन्वय साधण्यात येत होता. दोन दिवसांपूर्वी मधुबन हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आलेले ऋषभ पटेल, मयंक अग्रवाल आणि दीपक खत्री हे तिघेही याच अॅपद्वारे सट्टा खेळत होते.