अकोला : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या पीकेव्ही निवासस्थानामधून लोखंडी अँगल चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यास एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी अटक केली. या चोरट्यांकडून अँगल जप्त करण्यात आले आहेत.
पीकेव्ही क्वार्टर येथील रहिवासी शंकर नारायण देशमुख यांच्या घरासमोरील खुल्या प्लॉटमधून अज्ञात चोरट्यांनी लोखंडी अँगल चोरी केले होते. या प्रकरणाची तक्रार शंकर देशमुख यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली. यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास एमआयडीसी पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला. त्यांनी संशयावरून आरोपी सदानंद दीपक तायडे यास ताब्यात घेतले. त्याची कसून विचारपूस केली असता आरोपीकडून सहा लोखंडी अँगल जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर वानखेडे, दयाराम राठोड, नीलेश भोजने, संतोष डाबेराव यांनी केली.