अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या विविध कामांच्या लेखा परीक्षणात जिल्ह्यातील नऊ ग्रामपंचायतींमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आढळून आले आहेत. त्याप्रकरणी ग्रामपंचायतींनी ताळमेळ जोडून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसे न केल्यास अनियमितता केल्याप्रकरणी पुढील कारवाई होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.रोजगार हमी योजनेच्या जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांना लेखा परीक्षकांचा अहवाल देण्यात आला. त्यानुसार त्यातील आक्षेप, त्रुटी निकाली काढण्याचे सांगण्यात आले. त्यामध्ये १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या काळातील रोजगार हमी योजनेच्या विविध कामांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ठरावीक ग्रामपंचायतींचे खासगी लेखा परीक्षकांकडून लेखा परीक्षण करण्याचा उपक्रम दरवर्षी राबविला जातो. त्यानुसार ग्रामपंचायतींची लेखा परीक्षणासाठी निवडही केली जाते. ठरलेल्या कालावधीचे लेखा परीक्षण करण्यासाठी निश्चित केलेल्या काही ग्रामपंचायतींमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आल्या आहेत. त्या अनियमिततांबद्दल संबंधित ग्रामपंचायतींनी स्पष्टीकरण अथवा ताळमेळ जुळवून द्यावा, असा शेरा लेखा परीक्षकांनी दिला आहे. त्यानुसार संबंधित ग्रामपंचायतींकडून ही कार्यवाही पूर्ण करण्याचेही बजावण्यात आले आहे.विशेष म्हणजे, लेखा परीक्षणाचा अहवाल मार्चच्या पहिल्याच आठवड्यात जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. त्यानुसार पुढील कारवाईला सुरुवात झाली आहे. लेखा परीक्षणात तपासणी केलेल्या विविध मुद्यांची माहिती ग्रामपंचायतींकडून मिळाली नाही. तसेच उपलब्ध लेख्यांवरून त्याचा ताळमेळही जुळविता आला नाही. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींमध्ये कामात अनियमितता झाल्याची शक्यता आहे. ती पडताळण्यासाठी ग्रामपंचायतींकडून ताळमेळ मागविण्यात येत आहे. तसेच संबंधित मुद्यांचे स्पष्टीकरणही मागविण्यात येत आहे. त्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींच्या सचिवांना आता त्या बाबींची पूर्तता करावी लागणार आहे.
‘या’ ग्रामपंचायतींना मागविला ताळमेळत्यामध्ये अकोला तालुक्यातील तामशी, अकोट तालुक्यातील देवरी, पातूर तालुक्यातील उमरा, चांगेफळ, आसोला, पांढुर्णा, आलेगाव, सुकळी, गावंडगाव, सस्ती व देऊळगाव या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
दोन यंत्रणांनाही मागविले स्पष्टीकरणग्रामपंचायतींनी माहिती न देण्यासोबतच पातूर पंचायत समिती व मूर्तिजापूर तालुका कृ षी अधिकारी कार्यालयाच्या कामातही हा प्रकार घडला आहे. या दोन्ही यंत्रणांकडून ताळमेळासह स्पष्टीकरण मागविण्यात येत आहे.