अकोला: शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न करता, कोराेनाबाधित रुग्णांवर उपचार करताना अनियमितता करणाऱ्या अकोला शहरातील सहा खासगी रुग्णालयांच्या चालकांना प्रत्येकी ५० हजार रुपये दंड आकारण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवार, १९ एप्रिल रोजी दिला. खासगी रुग्णालयांच्या चौकशीसाठी गठित करण्यात आलेल्या समितीने चौकशी अहवाल सादर केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
खासगी रुग्णालयांची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी गठित केलेल्या समितीने अकोला शहरातील खासगी रुग्णालयांची पाहणी करून चौकशी केली. चौकशीनंतर समितीमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करण्यात आला. त्यामध्ये शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न करता, कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांवर उपचार करताना अनियमितता आढळून आल्याने, अकोला शहरातील रामदासपेठमधील सिटी हॉस्पिटल, बसस्थानकजवळील आधार हॉस्पिटल, हार्मोनी हॉस्पिटल, रतनलाल प्लाॅटमधील श्री गणेश हॉस्पिटल, जयहिंद चौकमधील डॉ. भिसे यांचा दवाखाना व बिहाडे हॉस्पिटल इत्यादी सहा खासगी रुग्णालयांच्या चालकांना प्रत्येकी ५० हजार रुपये दंड आकारण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिला.
रुग्णालयांमध्ये अशा आढळून आल्या अनियमितता!
शहरातील संंबंधित सहा खासगी रुग्णालयांमध्ये आरटीपीसीआर व रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट उशिराने झाल्या, काही अहवाल प्रलंबित असणे, चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तसेच अहवाल जिल्हा प्रशासनास न कळविणे, कोविड चाचणी निगेटिव्ह व एचआरसीटी स्कोअर जादा असताना रुग्णांना शासनाच्या रुग्णालयात व कोविड रुग्णालयात संदर्भित करण्याऐवजी नातेवाइकांच्या संमतीशिवाय रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर करणे, शासनाकडून वेळोवेळी निर्गमित सूचनांप्रमाणे डीसीएच किंवा डीसीएचसीला तत्काळ संदर्भित न करणे इत्यादी अनियमितता आढळून आल्याचा अहवाल चौकशी समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.
जादा आकारलेली रक्कम रुग्णास परत करण्याचा आदेश!
शहरातील बिहाडे हॉस्पिटल येथे एका रुग्णास जादा शुल्क आकारणी केल्याचे चौकशीत आढळले आहे. त्यामुळे जादा आकारलेली रक्कम संबंधित रुग्णास परत करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी बिहाडे हाॅस्पिटलला दिला आहे. तसेच याबाबतची अनियमितता आढळून आल्यास रुग्णालयाचे रजिस्ट्रेशन रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.