अकोला : शहरातील दीपक चौक परिसरातील अकोला क्रिकेट क्लब मैदानाला लागूनच सुरू असलेल्या इंडियन आॅइलच्या प्राइड सेल्स अॅण्ड सर्व्हिसेस पेट्रोल पंपावर विविध घोळ असल्याचे चव्हाट्यावर आल्याने, पेट्रोल पंप ‘सील’ करण्यात आले. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी शुक्रवारी रात्री छापा टाकून ही धडक कारवाई केली. या प्रकरणात रामदासपेठ पोलीस ठाण्यात पेट्रोल पंप चालक फिरोजअली अजगर अली, भागीदार सिमरनजितसिंह नागरा यांच्या विरूद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.शहरातील क्रिकेट क्लब मैदानाला लागूनच असलेल्या इंडियन आॅइल कार्पोरेशनच्या प्राइड सेल्स अॅण्ड सर्व्हिसेस या पेट्रोल पंपावर अनेक प्रकारचा घोळ असल्याची गोपनीय तक्रार जिल्हाधिकाºयांकडे प्राप्त झाली होती. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्यासह महसूल, पुरवठा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, मनपा अग्निशामक विभाग, नगररचना, महावितरण, भूमी अभिलेख व पोलीस विभागाच्या अधिकाºयांनी शुक्रवार, २१ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास पेट्रोल पंपवर छापा टाकला. संबंधित अधिकाºयांमार्फत करण्यात आलेल्या तपासणीत पेट्रोल पंपवर विविध स्वरूपाचे घोळ असल्याचे आढळून आले. त्यामुळे इंडियन आॅइल कार्पोरेशनचे अधिकारी गणपती भट यांनी पेट्रोल पंप ‘सील’ केले. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनात प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे, रामदासपेठ पोलीस ठाण्याचे ठाणेदार शैलेश सपकाळ, सिटी कोतवाली पोलीस ठाण्याचे ठाणेदार विलास पाटील यांच्यासह मनपा, महसूल व पोलीस विभागाच्या संबंधित अधिकाºयांनी ही कारवाई केली. पेट्रोल पंपवर आढळून आलेल्या अनियमिततासंदर्भात संबंधित विभागामार्फत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार पेट्रोल पंपाचा संचालक फिरोज अली अजगर अली आणि भागीदार सिमरनजितसिंह नागरा यांच्याविरूद्ध रामदासपेठ पोलीस ठाण्यात रात्री उशिरा एमआरटीपी अॅक्ट कलम ५२, ईसी अॅक्ट, जीवनावश्यक वस्तू अधिनियम, अग्नीशमन कायदा, भूमिअभिलेख कायदा आदी कलमांनुसार गुन्हा दाखल केला. ही कारवाई ठाणेदार शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनात पीएसआय संतोष आघाव, राजपालसिंह ठाकूर, दिनकर धुरंधर, हरिदास सोनोने यांनी केली. (प्रतिनिधी)
तपासणीत असा आढळून आला घोळ!पेट्रोल पंपाच्या तपासणी करताना अधिकाºयांना विविध प्रकारचा घोळ असल्याचे आढळून आले. त्यामध्ये बांधकामासाठी नगररचना विभागाची परवानगी घेण्यात आली नाही, भाडेपट्टापेक्षा (लीज) जास्त जागा ताब्यात घेण्यात आली, सिलेंडरचा अवैध वापर, अतिक्रमण तसेच असुरक्षितता व अस्वच्छता अशा प्रकारच्या अनियमितता आढळून आल्या.
पेट्रोल पंपावरून ७ सिलिंडर जप्तपेट्रोल पंपावर कारवाईदरम्यान पाच व्यावसायिक गॅस सिलिंडर आणि दोन घरगुती गॅस सिलिंडर आढळून आली. पोलिसांनी सर्व गॅस सिलिंडर जप्त केले.