अकोला- पश्चिम विदर्भात यावर्षी कमी पाऊस झाल्याने त्याचा परिणाम रब्बी हंगामातील पेरणीवर झाला असून, ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली, त्यांना पिके जगविण्यासाठी पराकोटीची धडपड करावी लागत आहे. बहुतांश भागात भूगर्भ पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने शेतकऱ्यांना संरक्षित ओलितासाठी पाणी नाही. जेथे थोडेफार पाणी तसेच वीज उपलब्ध आहे, तेथील शेतकरी तुषार सिंचनाद्वारे पिके जगविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे.
खरिपातील मूग, उडीद, सोयाबीन हातचे गेल्याने शेतकऱ्यांची भिस्त रब्बी हंगामावर होती. पण परतीचा दमदार पाऊस न झाल्याने जमिनीत पूरक ओलावाच नव्हता. परिणामी, पश्चिम विदर्भातील एकूण रब्बीच्या क्षेत्रापैकी ३६ टक्के क्षेत्र नापेर आहे. ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली, त्यांना आता पिके जगविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यातील धरणात यावर्षी पूरक जलसाठा संचयित झाला नसल्याने हिवाळी, उन्हाळी पिकांना पाणी न सोडण्याचे पाटबंधारे विभागाने जाहीर केल्याने शेतकरी हतबल झाला.
यावर्षी पश्चिम विदर्भात ९१ टक्के क्षेत्रावर हरभरा पेरणी झाली. अकोला जिल्ह्यातील शेतकºयांनी ४८,१४७ पेरणी केलेल्या क्षेत्रापैकी ४६,३५९ हेक्टरवर हरभरा पेरणी केली. बुलडाणा जिल्ह्यात ९१ हजार १३६ हेक्टरवर हरभरा पेरणी करण्यात आली असून, वाशिम जिल्ह्यात ३४,४४४ हेक्टरवर, यवतमाळ जिल्ह्यात ७६,३४३ तर अमरावती जिल्ह्यात ६२ हजार २६४ हेक्टरवर हरभरा पेरणी केली. हरभरा पिकाला जमिनीत ओलावा बऱ्यापैकी लागतो, त्यानंतर हिवाळ्यातील थंडीमुळे हे पीक येते. तथापि, हरभरा पेरणीनंतर पंधरा दिवस ढगाळ वातावरण होते. त्याचा प्रतिकूल परिणाम या पिकावर झाल्याचे चित्र आहे. ज्या शेतकऱ्यांकडे संरक्षित ओलिताची सोय आहे, तेथे पाणी देऊन हरभरा जगविण्याचे शेतकºयांचे प्रयत्न सुरू आहेत. पण बहुतांश शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय नाही.
- कृषी विद्यापीठातील हरभरा तुषार सिंचनावर!डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर हरभरा पेरणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, हरभºयाचे बीजोत्पादन घेण्यासाठी कृषी विद्यापीठाने हरभरा पेरणी केली; पण जमिनीत ओलावा नसल्याने कृषी विद्यापीठाला तुषार सिंचनावर हे पीक जगवावे लागत आहे. शेतकऱ्यांकडे संरक्षित ओलितासाठी पाणी उपलब्ध असेल, तर त्या पाण्याचे नियोजन करावे, पाण्याच्या उपलब्धतेनुसार क्षेत्र ठरवावे, तेवढ्याच क्षेत्राला पाणी द्यावे.- डॉ. सुभाष टाले, विभाग प्रमुख, मृद व जलसंधारण, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.