अकोला : काटेपूर्णा धरणातील जलसाठा आजमितीस ७७.१५ टक्के आहे. १०० टक्के जलसाठा या धरणात संचयित झाला होता. दोन महिन्यांत २३ टक्के पाणी वापर झाले आहे. पिण्याच्या पाण्यासह यावर्षी सिंचनाला या धरणातून पाणी सोडण्यात येत आहे; परंतु सिंचनासाठी अपेक्षित मागणी नसल्याने ८ हजार ३२५ पैकी आजमितीस केवळ ४ हजार हेक्टरवर सिंचन झाले आहे. असे असले तरी यावर्षी उन्हाळी पिकांना पाणी सोडले जाणार नाही.यावर्षी परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’ झाले. अकोला पूर संरक्षण योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या दगडपारवा प्रकल्पातूनही यावर्षी पाण्याचा विसर्ग करावा लागला. आजमितीस काटेपूर्णा धरणात ७७.१५ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मोर्णा या मध्यम स्वरू पाच्या धरणात ७३.०३ टक्के, निर्गुणात ७३.९३ टक्के, उमा धरणात ५२.४८ टक्के तसेच घुंगशी बॅरेजमध्ये ७१.०५ टक्के पाणी शिल्लक आहे. त्यामुळे यावर्षी रब्बी हंगामासाठी मुबलक पाणी उपलब्ध आहे. सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत आहे. यावर्षी उशिरा पाणी सोडण्यात आले; परंतु शेतकऱ्यांची मागणीच अपुरी असल्याने काटेपूर्णा धरणातून दररोज १६० क्यूसेस पाणी सिंचनासाठी सोडण्यात येत आहे.काटेपूर्णा धरणातून अकोला शहर, मूर्तिजापूर, अकोला औद्योगिक वसाहत व खांबोरा पाणी पुरवठा योजनेतून ६४ खेड्यांना पाणी सोडण्यात येत आहे. काटेपूर्णा धरणातून ८ हजार ३२५ हेक्टरला सिंचनासाठी पाणी सोडण्याचे नियोजन आहे. तथापि, यावर्षी आतापर्यंत ४ हजार हेक्टरलाच पाणी सोडण्यात येत आहे. यावर्षी काटेपूर्णा धरणात मुबलक जलसाठा उपलब्ध झाल्याने खारपाणपट्ट्यातील ६४ गावांचा पाणी प्रश्न मिटला आहे.
अकोल्याचे २४ दलघमी आरक्षणअकोला शहरासाठी २४ दलघमीचे आरक्षण आहे. महिन्याला दोन दलघमी पाण्याचा वापर होत आहे.
रब्बी हंगामातील पिकांना शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पाणी सोडण्यात येत आहे. आतापर्यंत ४ हजार हेक्टरवर सिंंचन सुरू आहे. पावसाळा लांबल्याने पाण्याची मागणी घटल्याचे यावर्षीचे चित्र आहे. उन्हाळी पिकांना पाणी सोडण्याचे कोणतेही नियोजन नाही.- अभिजित नितनवरे,उप-विभागीय अभियंता,पाटबंधारे विभाग,बोरगाव मंजू.