कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात करून उपचार घेऊन घरी परतले आहेत. सद्य:स्थितीत गावात एकही कोरोना रुग्ण नाही. असे असले तरी नागरिकांनी बेफिकीर न राहता, शासनाच्या नियमाचे पालन करावे, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या ग्रामीण भागात झपाट्याने वाढत आहे. इसापूर गावात कोरोनाचे १४ रुग्ण आढळले होते. यामध्ये एकाच कुटुंबातील आठ रुग्णांचा समावेश होता. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच, उपसपंच, सदस्य व आरोग्य विभागाने कसोशीने प्रयत्न केले. सद्य:स्थितीत गावात एकही कोरोना रुग्ण नसल्याने दिलासा मिळाला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने खबरदारी म्हणून गावात निर्जंतुकीकरण करण्यात आले. तसेच नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमित मास्कचा वापर करावा व सुरक्षित अंतर ठेवावे. शासकीय नियमाचे पालन करावे, अशा सूचना दिल्या. सरपंच मीराताई बोदडे यांनी वरिष्ठ स्तरावर वारंवार पाठपुरावा करून नागरिकांसाठी कोरोना लसीकरण कॅम्पचे आयोजन केले. तसेच गावकऱ्यांना लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले. लोकांच्या मनात लसीकरणाबाबत असलेल्या शंका दूर करण्याचा प्रयत्न करून त्यांचे लसीकरण करून घेतले. कोरोनाबाधित रुग्णांनी वेळेत उपचार घेऊन नियमांचे पालन करून ग्रामपंचायत व आरोग्य विभागाला सहकार्य केले. त्यामुळेच इसापूर ग्रामपंचायत सध्या कोरोनामुक्त झाले आहे.
इसापूर येथील ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्यामुळे कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत आहे. परंतु लसीकरणाची मंदावलेली गती वाढविल्यास गावामध्ये १०० टक्के लसीकरण पूर्ण होईल. कोरोना नियंत्रण समिती व ग्रामस्थांच्या मदतीने कोरोनाला रोखण्यात यश मिळाले.
मीराताई आनंद बोदडे,
सरपंच ग्रा.पं. इसापूर
इसापूर येथील नागरिकांचे जवळपास ४० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. अद्यापपर्यंत ६० टक्के नागरिकांचे लसीकरण व्हायचे आहे. गावात लसीकरण शिबिर घेण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे.
- महादेवराव नागे,
उपसरपंच, ग्रा.पं. इसापूर