अकाेट : गत तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या दर्यापूर रोड व अकोला रोड यांना जोडणाऱ्या अंडर ब्रिजचा प्रश्न लवकरच साेडविण्याचे आश्वासन पालकमंत्री बच्चू कडू यांनी सामाजिक संस्था संस्कृती संवर्धन समितीच्या पदाधिकाऱ्यांना अकाेट येथे दिले. दक्षिण मध्य रेल्वेने तयार केलेल्या नकाशाप्रमाणे त्याचे इस्टिमेट सादर करण्याचे आदेशही पालकमंत्र्यांनी अकोट नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्रीकृष्ण वाहूरवाघ यांना दिले.
अकोला-अकोट रेल्वे ट्रॅकवर दर्यापूर रोड व अकोला रोड जोडणाऱ्या अंडरब्रिजची मागणी शहरातील सामाजिक संस्थांनी तीन वर्षांपासून केली आहे. दरम्यान, अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांची अकोट येथील विश्रामगृहात भेट घेऊन त्यांना अंडरब्रिजच्या लढ्याबद्दल माहिती दिली. त्यावेळी पालकमंत्र्यांनी या भुयारी मार्गाची आवश्यकता असल्याचे मान्य केले. त्यामुळे प्रलंबित अंडरब्रिजचे काम विशिष्ट निधीतून पूर्ण करून देऊ, असे उपस्थितांना त्यांनी आश्वासित केले. यावेळी अकोटचे उपविभागीय अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे उपस्थित होते.
या अंडरब्रिजमुळे अपघाताचे प्रमाण कमी होईल. तसेच विद्यार्थी, वयोवृद्ध, पदचारी, सायकलस्वार, ॲम्बुलन्स, अंत्ययात्रेसाठी उपयुक्त ठरणार आहे. अकोला रेल्वेपुलावर जर ट्रॅफिक जाम झाल्यास हा पर्यायी मार्ग उपयुक्त ठरणार असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. निवेदन देताना संस्कृती संवर्धन समितीचे सदस्य ॲड. सचिन खलोकार, विनोद कडू, कल्पेश गुलाहे, अक्षय सुपासे, रुपेश डांगरे, संजय बोराेडे, अचल बेलसरे, सिद्धेश्वर इंगळे, रोहित शेगोकार, सोमवार वेस, दर्यापूर रोड, यशोदानगर, नंदिपेठ येथील नागरिक उपस्थित होते, असे समितीचे संस्थापक अध्यक्ष नंदकिशोर शेगोकार यांनी कळविले आहे.