अकोला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सुरू केलेल्या महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून पाण्याचे नियोजन आणि ग्रामीण भागातील विविध प्रश्नांवर चिंतन झाले पाहिजे, असे मत वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.राज्यातील मुंबई-पुणे व इतर काही जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुराने थैमान घातले आहे; मात्र विदर्भ आणि मराठवाड्यात पुरेशा पावसाअभावी अद्यापही विहिरी कोरड्या पडल्या असून, पाणी पातळीत वाढ झाली नाही. त्यामुळे पर्यावरणाच्या बदलामुळे धोका आणि पाणी वापराच्या समस्येवर मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून चर्चा झाली पाहिजे, तसेच ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजुरांच्या विविध प्रश्नांवर महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून चिंतन होण्याची गरज आहे, असेही किशोर तिवारी यांनी सांगितले.कृत्रिम पावसाचे काय झाले?विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात कृत्रिम पाऊस पाडण्याचे सरकारमार्फत जाहीर करण्यात आले होते; प्रत्यक्षात मात्र तसे झाले नाही. त्यामुळे कृत्रिम पाऊस पाडण्याचे काय झाले, असा सवालही किशोर तिवारी यांनी उपस्थित केला.