लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासनाच्या मालकीचा तब्बल २0 कोटी रुपयांचा भूखंड भूमी अभिलेख कार्यालयाच्या संगणकातील रेकॉर्डमध्ये हेराफेरी करून गजराज मारवाडी नामक इसमाच्या नावे करण्यात आल्याची कबुली भूमी अभिलेख कार्यालयाने बुधवारी प्रसिद्धीस दिलेल्या खुलाशात देण्यात आली आहे. एकीकडे सिटी कोतवाली पोलिसांना पत्र देऊन गजराज मारवाडी याच्या नावे संगणकात असलेली नोंद रद्द करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने प्रयत्न चालविला आहे, तर दुसरीकडे भूखंड हडपण्याचा कुठलाच प्रकार झाला नसल्याचे पत्रक काढून या विभागातील दोषी अधिकारी व कर्मचार्यांना वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न चालविल्याचे समोर आले आहे.अकोला शहरातील शीट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/१ व शीट नं. ३७ बी १२१/१ अ हे संतोषी माता मंदिरानजीकचे भूखंड शासनाच्या नावे आहेत. या भूखंडातील शीट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/‘पैकी’ असा शब्दप्रयोग करून तब्बल २0 कोटी रुपये किमतीचा ३ हजार ७१७.१७ चौरस मीटर भूखंडाचे हस्तलिखित दस्तावेज नसताना तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचार्यांच्या संगनमताने गजराज गुदडमल मारवाडी याच्या नावे संगणकात ऑनलाइन नोंद घेण्यात आल्याचे प्रकरण ‘लोकमत’ने उघडकीस आणले. या प्रकरणाची तक्रार सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात करण्यात आली. नंतर भूमी अभिलेख कर्मचार्यांसह आणखी काही जणांचे बयाण नोंदविले आहे. या सदंर्भात भूमी अभिलेख विभागाने बुधवारी प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या खुलाशात शासनाचा असा भूखंड हडपण्याचा प्रकार झालाच नाही, असे दर्शविण्याचा प्रयत्न या पत्रकातील पहिल्याच परिच्छेदात करण्यात आला आहे; मात्र दुसर्या परिच्छेदात भूमी अभिलेख खात्याच्या कार्यपद्धतीच्या विपरित ‘१२१ /पैकी’ असा शब्दप्रयोग करून सदर भूखंडाबाबत संगणकातच नोंद केल्याचे मान्य करीत भूखंड हडपण्याच्या प्रकारावर शिक्कामोर्तब केले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला असून हा प्रकार ज्या काळात घडला त्या काळातील कर्मचार्यांची नावे देण्यात हाच विभाग वेळकाढूपणा करत येत आहे. त्यामुळे दोषी अधिकारी व कर्मचार्यांवर फौजदारी कारवाई करण्यास सिटी कोतवाली पोलिसांना अडचणी येत आहेत.
एनआयसीकडून अहवालच (सीडीचा) नाहीभूमी अभिलेख विभागातील संगणकामध्ये ज्या दिवशी आणि ज्या तारखेला सदर भूखंडाची ऑनलाइन नोंद घेण्यात आली, ज्या अधिकारी आणि कर्मचार्यांनी ही नोंद केली, त्या दिवसाच्या संगणकीय नोंदीची कॉम्पॅक्ट डिस्क (सीडी) तयार करण्यात आली आहे. या सीडीमध्ये सदर प्रकरणाची इत्थंभूत माहिती आहे; मात्र ही सीडी जिल्हाधिकारी कार्यालयातील राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एनआयसी) येथे सादर करण्यात आली आहे. भूखंड हडपल्याच्या प्रकरणाचा ‘लोकमत’ने पर्दाफाश केल्यानंतर भूमी अभिलेख विभागाने ही सीडी मागितली; मात्र आठ दिवसांचा कालावधी उलटल्यावरही एनआयसीकडून ही सीडी उपलब्ध करून देण्यात आलेली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
खरेदी-विक्री न करण्याची सूचनादुय्यम निबंधक खरेदी-विक्री यांनी या भूखंडाच्या संगणकीय प्रतीवरून खरेदी-विक्रीचा व्यवहार करू नये, असे पत्र भूमी अभिलेख विभागाने दुय्यम निबंधकांना दिले आहे. एकीकडे गैरव्यवहार झाला नसल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे, तर या संगणकीय प्रतीच्या आधारे खरेदी-विक्रीचा व्यवहार न करण्याचे पत्रही दुय्यम निबंधकांना देण्यात आलेले आहे. यावरून भूमी अभिलेख विभागाची भूमिका संशयास्पद असल्याचे सिद्ध होत आहे.
रेकॉर्ड रद्द करण्यासाठी दिले पोलिसांना पत्रभूमी अभिलेख विभागाने सिटी कोतवाली पोलिसांना पत्र देऊन भूखंड हडपल्याच्या प्रकरणात संगणकामध्ये भूखंडाची नोंद गजराज गुदडमल मारवाडी यांच्या नावे असल्याचे कबूल केले असून, ही नोंद रद्द करण्याची परवानगी पोलिसांना मागितली आहे; मात्र अद्याप सिटी कोतवाली पोलिसांनी भूमी अभिलेख विभागाला संगणकातील नोंद रद्द करण्याची परवानगी दिलेली नसल्याची माहिती आहे.
खुलासा आणि पोलिसांना दिलेल्या पत्रात तफावतभूमी अभिलेख कार्यालयाने दिलेल्या खुलाशामध्ये आणि सिटी कोतवाली पोलिसांना भूमी अभिलेख विभागानेच दिलेल्या पत्रामध्ये प्रचंड तफावत आहे. एकीकडे ही संगणकीय प्रत बनावट असल्याचे त्यांनी खुलाशामध्ये म्हटले असून, दुसरीकडे भूमी अभिलेख विभागातील संगणकात गजराज मारवाडी यांच्या नावे असलेली भूखंडाची नोंदणी रद्द करण्याची परवानगी मागण्यात आलेली आहे. यावरून भूमी अभिलेख विभाग आता संशयाच्या घेर्यात सापडला असून, खुलासा आणि पोलिसांना दिलेल्या पत्रात अशा प्रकारे तफावत का आहे, हा संशोधनाचा विषय आहे.
भूमी अभिलेख विभागाचे पत्र प्राप्त झाले असून, त्यांनी गजराज मारवाडी यांच्या नावे संगणकात असलेली नोंद रद्द करण्यासाठी ३ ऑगस्ट रोजी पत्र देऊन परवानगी मागितली; मात्र ही नोंद रद्द करणे म्हणजे पुरावे नष्ट करण्याचा प्रकार आहे. त्यामुळे सदर संगणकाशी छेडछाड करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. यासोबतच ती नोंद रद्द करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.- अनिल जुमळे,ठाणेदार, सिटी कोतवाली पोलीस स्टेशन.