संतोष येलकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, अकोला: जिल्ह्यात बुधवारी रात्री धो-धो पाऊस बरसला असून, बार्शिटाकळी तालुक्यासह आठ महसूल मंडळांच्या परिसरात अतिवृष्टी झाली. यंदाच्या पावसाळ्यातील पहिल्यांदा जिल्ह्यात सार्वत्रिक जोरदार पाऊस बरसल्याने नदी नाल्यांना पूर आला आहे. यंदाचा पावसाळा सुरू झाल्यानंतर महिना उलटला तरी पाऊस रुसलेलाच होता.
अखेर गेल्या ५ जुलैपासून जिल्ह्यात पावसाची हजेरी सुरू केली असून, कधी काही भागात दमदार तर कधी काही भागात रिमझिम पाऊस बरसत होता. या पार्श्वभूमीवर सार्वत्रिक जोरदार पावसाची सर्वत्र प्रतीक्षा केली जात असतानाच, बुधवार, १२ जुलै रोजी रात्री जिल्ह्यातील विविध भागात जोरदार पाऊस बरसला. रात्रभर धो-धो पाऊस बरसला. गेल्या २४ तासांत गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ४५.७ मिलीमीटर पाऊस बरसला असून, त्यामध्ये जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालुक्यासह चार तालुक्यातील आठ महसूल मंडळांच्या परिसरात ६५ मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस बरसल्याने बार्शिटाकळी तालुक्यासह आठ मंडळांच्या परिसरात अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली. यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात पहिल्यांदाच धुवाधार बरसलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आला. त्यामुळे पूर आलेल्या भागात गुरुवारी जनजीवन विस्कळीत झाले होते.
गेल्या २४ तासात तालुकानिहाय असा बरसला पाऊस!
तालुका मि.मी.बार्शिटाकळी ७७.८
अकोला ६०.०बाळापूर ५८.६
पातूर ५३.७अकोट ३४.२
तेल्हारा २१.१मूर्तिजापूर ७.५
बार्शिटाकळी तालुक्यासह आठ मंडळात अशी झाली अतिवृष्टी!
जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालुक्यात ७७.८ मि.मी. पाऊस पडल्याने या तालुक्यात अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली. यासोबतच जिल्ह्यातील चार तालुक्यातील आठ महसूल मंडळांच्या परिसरात अतिवृष्टी झाली आहे. त्यामध्ये अकोला तालुक्यातील अकोला महसूल मंडळात ९८.५ मि.मी., कापशी मंडळात ९५.८ मि.मी. आणि कौलखेड मंडळात ८३.५ मि.मी., बार्शिटाकळी तालुक्यातील बार्शिटाकळी मंडळात ८८.८ मि.मी., राजंदा मंडळात ११७.३ मि.मी., बाळापूर तालुक्यातील व्याळा मंडळात ९२ मि.मी., वाडेगाव मंडळात ७५ मि.मी. आणि पातूर तालुक्यातील बाभुळगाव मंडळात ६६ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.
नदी, नाल्यांना आला पूर; घरांमध्ये घुसले पाणी!
जिल्ह्यातील विविध भागात बुधवारी धो-धो पाऊस बरसल्याने, नदी, नाले वाहू लागले असून, काही भागात नदी व नाल्यांना पूर आला. त्यामध्ये काही भागात नदी व नाल्याकाठच्या घरांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने घरांची पडझड आणि घरांतील साहित्याचे नुकसान झाले.